वाणी ज्ञानेश्वरांची

जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं । तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ॥
अर्जुना, जे सर्वत्र, सर्व देहात व्यापलेले आहे व ज्याचा घात करायचे असे ठरविले तरी तो होत नाही, असे एक चैतन्यच जगद्रूप आहे, असे तू पहा.
जयाचेनि स्वभावें । हें होत जात आघवें । तरी सांग काय शोचावें । एथ तुवां ॥
या चैतन्याच्या स्वभावाने हे सर्व उत्पन्न होऊन नाश पावते, तर मग तू यातील कशाविषयी दुःख करावेस, ते सांग बरे?
एर्‍हवीं तरी पार्था । तुज कां नेणों न मनें चित्ता । परी किडाळ हें शोचितां । बहुतीं परीं ॥
पार्था, तुझ्या मनाला हे का पटत नाही, ते मला समजत नाही; परंतु एकंदरीत असे दुःख करणे अनेक प्रकारे अनुचित आहे.
तूं अझुनि कां न विचारिसी । काय हें चिंतितु आहासी । स्वधर्मु तो विसरलासी । तरावें जेणें ॥
अरे, अजूनही तू का विचार करीत नाहीस? हे तू काय घेऊन बसला आहेस? ज्या स्वधर्माने मनुष्य तरतो, त्याला तू अगदी विसरलास!
या कौरवां भलतें जाहलें । अथवा तुजचि कांहीं पातलें । कीं युगचि हें बुडालें । जर्‍ही एथ ॥
असे समज की, या ठिकाणी या कौरवांचे भलतेच काही झाले किंवा तुझे कमी जास्त झाले अथवा सगळे जग नाहीसे झाले,
तरी स्वधर्मु एकु आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे । मग तरिजेल काय पाहें । कृपाळूपणें ॥
तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे, तो सर्वथा त्याज्य नाही; त्याचा त्याग केल्यावर तुझ्या या कृपाळूपणाने तू तरला जाशील काय?