कां कवण एकु भ्रमलेपणें । मी तो नव्हे गा चोरलों म्हणे । ऐसा नाथिला छंदु अंतःकरणें । घेऊनि ठाके ॥
किंवा एखादा मनुष्य भ्रमाने माझा मीच हरवलो असे म्हणतो आणि अंतःकरणात तोच खोटा भाव धरून बसतो.
एर्हवी होय तें तोचि आहे । परि काई कीजे बुद्धि तैशी नोहे । देखा स्वप्नींचेनि घायें । कीं मरे साचें ॥
एर्हवी या भ्रमाशिवाय पाहू गेले असता तो स्वतः च ब्रह्मरूप आहे; परंतु काही केल्याने त्याचे बुद्धीला मी ब्रह्मरूप आहे असे भान न होता, मी दुःखी आहे असा भास होतो. परंतु तेव्हाही त्याची ब्रह्मरूपता नष्ट होत नाही, पहा की स्वप्नातील तलवारीच्या वाराने कोणी खरोखर मरतो काय?
जैशी ते शुकाचेनि आंगभारें । नळिका भोविन्नली एरी मोहरें । तेणें उडावें परि न पुरे । मनशंका ॥
राघूला धरण्याकरिता टांगलेली झाडावरील नळी त्याच्या अंगभाराने उलट फिरली असता तो उडून न जाता आपणच फिरलो अशी मनांत शंका येऊन ती जशी सोडीत नाही,
वायांचि मान पिळी । अटुवें हियें आंवळी । टिटांतु नळी । धरूनि ठाके ॥
व्यर्थ मान हालवतो आणि छातीने व चवड्याने ती नळी आवळून चोचीने धरून ओरडतो आणि म्हणतो की,
म्हणे बांधला मी फुडा । ऐसिया भावनेचिया पडे खोडां । कीं मोकळिया पायांचा चवडा । गोंवी अधिकें ॥
मी खरोखर बांधला गेलो; अशाच समजुतीने खोड्यात पडतो आणि मोकळ्या पायाचे चवड्याने नळी अधिक बळकट धरतो.
ऐसा काजेंवीण आंतुडला । तो सांग पां काय आणिकें बांधिला । मग न सोडीच जर्ही नेला । तोडूनि अर्धा ॥
अशा स्थितीत त्याला अर्धा तोडून जरी नेला तरी तो ती नळी सोडीत नाही; असा जो निरर्थक सापडला, त्याला कोणी दुसरे बांधावयास आले होते का? सांग बरे.
वाणी ज्ञानेश्वरांची
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -