मुखींच्या ज्वाळीं । तळीं वरी कवळी । मांसाची वडवाळी । आरोगूं लागे ॥
आणि मुखातील ज्वालांनी खालवरचे मांसादिकाचे घास करून खाऊ लागते.
जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस । पाठी एकदोनी घांस । हियाही भरी ॥
ज्या ठिकाणी मांस असेल, त्याचा सहज घास घेते आणि मागाहून त्या राहिलेल्या भागाचाही घास घेते.
मग तळवे तळहात शोधी । ऊर्ध्वींचे खंड भेदी । झाडा घे संधी । प्रत्यांगाचा ॥
मग पायांचे तळ व हातांचे तळ यांचे शोधन करून वरील अंगाचा भेद करिते आणि दरएक अंगाचा व सांध्यांचा शोध घेते.
अधोभाग तरी न संडी । परि नखींचेही सत्त्व काढी । त्वचा धुवूनि जडी । पांजरेंशीं ॥
आपली मूळ जागा न सोडता नखातीलही सत्व काढते व त्वचा धुऊन हाडांच्या व शरीराच्या सापळ्यास मिळविते.
अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर वोरपे । तंव बाहेरी विरूढी करपे । रोमबीजांची ॥
आस्थीच्या नळ्यातील रस काढून शिरांचे गाभे ओरपून टाकते, त्या योगाने बाहेरील केसांच्या मुळांची वाढ करपून जाते.
मग सप्तधातूंच्या सागरीं । ताहानेली घोंट भरी । आणि सवेंचि उन्हाळा करी । खडखडीत ॥
नंतर सप्तधातूंच्या सागरात आपली तहान भागवते आणि त्याबरोबर जिकडे तिकडे शरीर खडखडीत कोरडे करून टाकते.
नासापुटौनि वारा । जो जातसे अंगुळें बारा । तो गच्च धरूनि माघारा । आंतु घाली ॥
नाकपुड्यातून जो बारा बोटे वाहणारा वारा त्या प्राणवायूस घट्ट धरून आत ओढते.
तेथ अधवरौतें आकुंचे । ऊर्ध्वतळौतें खांचे । तया खेंवामाजि चक्रांचे । पदर उरती ॥
त्या वेळेस प्राण व अपान हे दोन वायू आकुंचित होतात व प्राण अपानास दाबून धरतो आणि त्या दोघांच्या आलिंगनामध्ये चक्राचे सांगाडे उरतात.