घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ऐसेनिहि प्राणसंकटें । जरी विपायें पां निघणें घटे । तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ॥
इतकेही करून जर कदाचित मोठ्या कष्टाने येथून तुझी सुटका झाली, तरी ते वाचणे मरणापेक्षाही वाईट असेल.
तूं आणीकही एक न विचारिसी । एथ संभ्रमें झुंजों आलासी । आणि सकणवपणें निघालासी । मागुता जरी ॥
आणखी एक गोष्टीचा तू विचार केला नाहीस. तू या ठिकाणी मोठ्या थाटाने युद्धास आला आहेस. जर दयार्द्र होऊन परत फिरलास,
तरी तुझें तें अर्जुना । या वैरियां दुर्जनां । कां प्रत्यया येईल मना । सांगैं मज ॥
तर अर्जुना, तूच सांग की, तुझा हा दयाळूपणा हे तुझे दुर्जन वैरी कौरव यांना खरा वाटेल का?
हे म्हणती गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला । हा सांगैं बोलू उरला । निका कायी? ॥
हे म्हणतील,‘गेला रे गेला! अर्जुन आम्हाला भिऊन पळून गेला.’ अरे, असा हा तुझ्यावर आलेला लोकापवाद चांगला का?
लोक सायासें करूनि बहुतें । कां वेंचिती आपुलीं जीवितें । परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा ॥
धनुर्धरा; पाहिजे तितके प्रयत्न करून किंवा प्रसंगी प्राणही खर्ची घालून लोक जी कीर्ति मिळवितात,
ते तुज अनायासें । अनकळित जोडिली असे । हें अद्वितीय जैसें । गगन आहे ॥
ती आभाळाप्रमाणे अनुपमेय व निष्प्रतिबंध कीर्ति मिळविण्याची संधी अनायासाने तुला मिळाली आहे.
तैसी कीर्ती नि:सीम । तुझ्यां ठायीं निरुपम । तुझे गुण उत्तम । तिहीं लोकीं ॥
तुझी कीर्ति अमर्याद असून तुझे गुणही उपमारहीत आहेत, अशी तिन्ही लोकात ख्याती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -