Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती । जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥
देशांतरीचे राजेरजवाडे स्तुतिपाठक होऊन तुझी कीर्ति गातात. ती ऐकून यमादिकदेखील तुला भितात!
ऐसी महिमा घनवट । गंगा जैसी चोखट । जया देखीं जगीं सुभट । वाट जाहली ॥
त्या कीर्तिचा महिमा गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मल व गहन आहे; आणि तो ऐकून जगातील मोठमोठ्या योद्ध्यांना कीर्ति संपादन करण्याचा मार्ग सापडला आहे.
तें पौरुष तुझें अद्भुत । आइकोनियां हे समस्त । जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ॥
असा तुझ्या अद्भुत पराक्रमाचा महिमा ऐकून हे सर्व कौरव आपल्या प्राणावर उदार झाले आहेत.
जैसा सिंहाचिया हांका । युगांतु होय मदमुखा । तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ॥
ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकल्याबरोबर उन्मत्त हत्तीलाही प्रलयकाळच ओढवला असे वाटते, त्याप्रमाणे या सर्व कौरवांस तुझी भीती वाटते.
जैसे पर्वत वज्रातें । ना तरी सर्प गरुडातें । तैसे अर्जुना हे तूंतें। मानिती सदा ॥
ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात, त्याप्रमाणे हे कौरव तुला नेहमी समजत आहेत.
तें अगाधपण जाईल । मग हीणवो अंगा येईल । जरी मागुता निघसील । न झुंजतुचि ॥
तेव्हा आता युद्ध न करिता जर परत फिरशील, तर ही तुझी थोरवी नष्ट होऊन तुला हीनत्व प्राप्त होईल.
आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनि अवकळा करिती । न गणित कुटी बोलती । आइकतां तुज ॥
बरे, पळून जाऊ म्हणशील तर हे तुला जाऊ देणार नाहीत. तुला धरून आणून तुझी फजिती करतील आणि तुझ्या तोंडावर तुझी निंदा करतील.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -