घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

येथ एक नवलावो । जो जो कीजे तरणोपावो । तो तो अपावो । होय तें ऐक ॥
आणखी येथे एक मोठेच नवल आहे! ही नदी तरून जाण्याला जे जे उपाय करावे, ते ते अपायकारकच होतात!
एक स्वयंबुद्धीच्या बाहीं । रिगाले तयांची शुद्धीचि नाहीं । एक जाणिवेचे डोहीं । गर्वेंचि गिळिले ॥
कोणी शहाणपणाच्या बळावर [ही मधून तरून जावे म्हणून] हिजमध्ये उडी टाकली, त्यांचा पत्ताच नाही; कोणाला ज्ञानरूपी डोहात गर्वाने पार गिळून टाकले.
एकीं वेदत्रयाचिया सांगडी । घेतल्या अहंभावाचिया धोंडी । ते मदमीनाच्या तोंडीं । सगळेचि गेले ॥
कोणी वेदत्रयीच्या सांगडीवर बसून तिला मीपणाचे धोंडे बांधून तरून जाण्यास निघाले; ते मदरूपी माशाच्या तोंडात संबंधच नाहीसे झाले;
एकीं वयसेचें जाड बांधले । मग मन्मथाचिये कांसे लागले । ते विषयमगरीं सांडिले । चघळूनियां ॥
कोणी तारुण्याच्या बळाने कंबर कसून मदनाच्या कासेला लागले, तो त्यांना विषयरूप सुसरीनेच चघळून टाकिले;
आतां वार्धक्याचा तरंगा । माजीं मतिभ्रंशाचा जरंगा । तेणें कवळिजताती पैं गा । चहूंकडे ॥
मग ते वार्धक्यरूप लाटांमध्ये तरंगत जात असता मतिभ्रंशरूप जाळ्यात सापडतात व त्यायोगे चहूकडून जखडले जाऊन
आणि शोकाचा कडा उपडत । क्रोधाच्या आवर्तीं दाटत । आपदागिधीं चुंबिजत । उधवला ठायीं ॥
शोकरूप कड्यावर आपटतात आणि पुढे क्रोधरूपी भोवर्‍यात सापडले असता कोठे वर डोके करावयास लागले की, आपत्तिरूप गिधाडे त्यास टोचटोचून खाऊ लागतात;
मग दुःखाचेनि बरबटें बोंबले । पाठीं मरणाचिये रेवे रेवले । ऐसे कामाचे कांसे लागले । ते गेले वायां ॥
आणि मग ते दुखःरूप चिखलाने माखून मरणरूप वाळूत रुततात! अशा प्रकारे जे विषयाच्या मागे लागले. ते फुकट जातात. (त्याचे जिणे व्यर्थ होते.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -