एकीं यजनक्रियेची पेटी । बांधोनि घातली पोटीं । ते स्वर्गसुखाच्या कपाटीं । शिरकोनि ठेले ॥
कोणी यज्ञादिक क्रियारूपी पेटा बांधून पोटाखाली घेतात. ते स्वर्गसुखरूपी कपारीत अडकून राहतात.
एकीं मोक्षीं लागावयाचिया आशा । केला कर्मबाह्यांचा भरंवसा । परी ते पडिले वळसां । विधिनिषेधांच्या ॥
कोणी मोक्षप्राप्तीच्या आशेने कर्मरूप बाहुबलावर विश्वास ठेवतात, परंतु कर्तव्याकर्तव्याच्या भोवर्यात पडतात.
जेथ वैराग्याची नाव न रिगे । विवेकाचा तागा न लगे । वरि कांहीं तरों ये योगें । तरी विपाय तो ॥
ज्या नदीमध्ये वैराग्यरूप नाव चालत नाही आणि जिला विचाराचा दोर लागत नाही, तथापि योगाने काहीशी तरून जाता येते; पण असे क्वचितच घडते.
ऐसें तरी जीवाचिये आंगवणें । इये मायानदीचें तरणें । हें कासयासारिखें बोलणें । म्हणावें पां ॥
परंतु जीवाच्या अंगबळाने या मायारूप नदीतून तरून जाता येते, हे म्हणणे कशासारखे आहे म्हणावे, ते सांगतो.
जरी अपथ्यशीळा व्याधी । कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी । कीं रागी सांडी रिद्धी । आली सांती ॥
जर पथ्य न करणाराची व्याधी टळेल, साधूला दुर्जनाची बुद्धि कळेल किंवा विषयासक्त पुरुष ऐश्वर्य प्राप्त झाले असता त्याला सोडील;
जरी चोरां सभा दाटे । अथवा मीनां गळु घोटे । ना तरी भेडा उलटे विवसी जरी ॥
जर चोरांची सभा भरेल, अथवा माशाला गळ गिळिता येईल किंवा भित्रा मनुष्य पिशाच्चाला फिरवील;
पाडस वागुर कारांडी । कां मुंगी मेरु वोलांडी । तरी मायेची पैलथडी । देखती जीव ॥
जर हरणाचे पाडस जाळे कुरतडीत किंवा मुंगी मेरूपर्वत ओलांडील तरच जीवांना [आपल्या स्वःताच्या शहाणपणाने ] मायानदी तरून पलीकडल्या तीरी जाता येईल!