म्हणौनि गा पंडुसुता । जैसी सकामा न जिणवेचि वनिता । तैवीं मायामय हे सरिता । न तरवे जीवां ॥
म्हणून, हे पंडुसुता ज्याप्रमाणे विषयी पुरुषाला स्त्री जिंकवत नाही, त्याप्रमाणे ही मायारूप नदी जीवाला तरवत नाही.
येथ एकचि लीला तरले । जे सर्वभावें मज भजले । तयां ऐलीच थडी सरलें । मायाजळ ॥
परंतु जे मला अनन्यभावाने शरण येतात, ते या दुस्तर नदीतून सहज तरून जातात. इतकेच नव्हे तर ते अलीकडच्या काठी असतानाच मायारूप जल पार नाहीसे होते.
जयां सद्गुरुतारूं फुडें । जे अनुभवाचे कांसे गाढे । जयां आत्मनिवेदन तरांडें । आकळलें ॥
ज्यांना सद्गुरु हाच नावाडी असून ज्यांनी ब्रह्मसाक्षात्काराची कास बळकट धरली आहे व ज्यांना आत्मनिवेदन हेच तारू सापडले आहे.
जे अहंभावाचें वोझें सांडुनी । विकल्पाचिया झुळका चुकाउनी । अनुरागाचा निरुता होउनी । पाणिढाळु ॥
जे अहंभावाचे ओझे टाकून, विकल्परूपी वारा चुकवून आणि बायकामुलांच्यावरील प्रेमरूपी पाण्याची धार टाळून,
जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा । मग निवृत्तीचिया पैल तीरा । झेंपावले जे ॥
जीवात्म्याचे ऐक्य हाच उतार त्या उताराने बोधरूपी सांगडीच्या आश्रयाने निवृत्तीच्या पलीकडील तीराला जे उड्या मारीत निघाले,
ते उपरतीच्या वांवीं सेलत । सोहंभावाचेनि थावें पेलत । मग निघाले अनकळित । निवृत्तितटीं ॥
ते वैराग्यरूप हात टाकीत ‘अहं ब्रह्म’ या भावाच्या बळावर पोहून मुक्तितटावर अचूक निघतात.
येणें उपायें मज भजले । ते हे माझी माया तरले । परि ऐसे भक्त विपाइले । बहुवस नाहीं ॥
या उपायाने जे मला भजतात, तेच या मायरूप नदीतून तरून जातात; परंतु असे भक्त फार नाहीत, अगदी विरळ आहेत!