Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तैसें ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे । जेथ पूर्वानुक्रमु दिसे । चोखाळत ॥
त्याप्रमाणे इहलोकचे सुख नाहीसे न होता मोक्ष अंतरत नाही. ज्या बुद्धियोगात पूर्वी केलेले धर्मानुष्ठान पुढे खंड पडला तरी नष्ट होत नाही.
कर्माधारें राहाटिजे । परी कर्मफळ न निरीक्षिजे । जैसा मंत्रज्ञु न बंधिजे । भूतबाधा ॥
कर्माच्या आधाराने वागणूक ठेवावी, परंतु त्या कर्मापासून होणार्‍या फळाची इच्छा धरू नये. जसा पंचाक्षरी भूतापासून बाधा पावत नाही.
तियापरी जे सुबुद्धि । आपुलालिया निरवधि । हा असतांचि उपाधि । आकळूं न सके ॥
त्याचप्रमाणे, (कर्मफळाच्या ठिकाणी आसक्ती न ठेवता निरभिमान बुद्धिने कर्म करण्याची) सद्बुद्धि ज्याला प्राप्त झाली आहे, त्याला जन्ममरणाची उपाधि- बाधा करीत नाही.
जेथ न संचरे पुण्यपाप । जें सूक्ष्म अति निष्कंप । गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥
ज्या बुद्धीला पापपुण्याची बाधा होत नाही. जी अतिशय सूक्ष्म असून निश्चल आहे आणि सत्त्व, रज व तम हे तिन्ही गुण जिच्यात प्रवेश करीत नाहीत;
अर्जुना तें पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे । तरी अशेषहि नाशे । संसारभय ॥
अर्जुना, अशी जी सुबुद्धि ती पुण्याईने थोडीशी जरी एखाद्याला प्राप्त झाली, तरी ती सर्व संसारभयाचा नाश करते.
जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रगटी । तैसी सद्बुद्धि हे थेकुटी । म्हणों नये ॥
ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असूनही तिचा प्रकाश मोठा पडतो, त्याप्रमाणे, सद्बुद्धि अल्प असली तरी तिला लहान समजू नये.
पार्था बहुतीं परीं । हे अपेक्षिजे विचारशूरीं । जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना ॥
अर्जुना, जे ज्ञानी आहेत ते अनेक प्रकारे हिची इच्छा करतात; परंतु ती सद्बुद्धि जगतात फार दुर्लभ आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -