घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

हें असोतु या बोलांचीं ताटें भलीं । वरी कैवल्यरसें वोगरलीं । ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ॥
हे असो. त्या बोलाची मोठाली ताटे बनवून त्यात मोक्षरस वाढून, निष्कामी लोकांना ही ग्रंथरूपी मेजवानीच केली आहे.
आतां आत्मप्रभा नीच नवी । तेचि करूनि ठाणदिवी । जो इंद्रियांतें चोरूनि जेवी । तयासीचि फावे ॥
या मेजवानीत उजेडाकरिता नित्य नवी अशी आत्मज्योतीची ठाणवई करून, त्या उजेडात जो इंद्रियांना नकळत मेजवानीचे सेवन करील त्यालाच तिची प्राप्ती होईल.
येथ श्रवणाचेनि पांगें । वीण श्रोतयां होआवे लागे । हे मनाचेनि निजांगें । भोगिजे गा ॥
या ठिकाणी श्रवणाचे साधन जे कान ते टाकून देऊन श्रोत्यांनी मनानेच उपभोग घ्यावा.
आहाच बोलाची वालीफ फेडिजे । आणि ब्रह्माचियाचि आंगा घडिजे । मग सुखेंसी सुरवाडिजे । सुखाचिमाजीं ॥
बोलरूपी साल अगोदर काढून टाकून बोलाचे लक्ष जे ब्रह्म तेथे तद्रूप होऊन मग सुखानेच सुखाची गोडी घ्यावी.
ऐसें हळुवारपण जरी येईल । तरीच हें उपेगा जाईल । एर्‍हवीं आघवी गोठी होईल । मुकिया बहिरयाची ॥
इतक्या तर्‍हेचे सूक्ष्म मन जर होईल, तरच त्याचा उपयोग होईल; नाही तर सर्व गोष्टी मुक्याने बोलून बहिर्‍याने ऐकल्याप्रमाणे होतील.
परी तें असो आतां आघवें । नलगे श्रोतयांतें कडसावें । जे अधिकारिये एथ स्वभावें । निष्कामकामु ॥
परंतु ते प्रतिपादन आता असो! श्रोत्यांची चिकित्सा करण्याची ही वेळ नव्हे. सामान्यतः जे निष्काम पुरुष असतील तेच या मेजवानीचे अधिकारी आहेत.
जिहीं आत्मबोधाचिया आवडी । केली स्वर्गसंसाराची कुरोंडी । तेवांचूनि एथींची गोडी । नेणती आणिक ॥
ते निष्काम कसे म्हणशील तर ज्यांनी ब्रह्मज्ञानाच्या आवडीने स्वर्ग आणि संसार यांच्या प्राप्तीची ओवाळणी केली आहे, त्यांच्याशिवाय इतरांना या बोलाची गोडी कळणार नाही.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -