बहुतकरूनि निःशब्द । दाट न रिगे श्वापद । शुक हन षट्पद । तेउतें नाहीं ॥
तेथे बहुतकरून गडबड नसावी व श्वापदांची गर्दी नसावी; परंतु राघू आणि भ्रमर हे जुजबी असावेत.
पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें । कवणे एके वेळे बैसे । तरी कोकिळही हो ॥
त्या ठिकाणी बदके, हंस, दोन चार चक्रवाक पक्षी, तसेच एखादे वेळेस कोकिळ पक्षी येऊन बसला तरी चालेल.
निरंतर नाहीं । तरी आलीं गेलीं कांहीं । होतु कां मयूरेंही । आम्ही ना न म्हणों ॥
नेहमी नाही पण येऊन जाऊन मोर असले तरी आम्ही त्यांना नको म्हणणार नाही.
परि आवश्यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा । तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ॥
परंतु हे पांडवा, अवश्य अशा तर्हेची एक जागा पहावी आणि त्या ठिकाणी गुप्त गुहा किंवा शिवालय असावे;
दोहींमाजी आवडे तें । जें मानलें होय चित्तें । बहुतकरूनि एकांतें । बैसिजे गा ॥
आणि दोघांतील जे आपणास आवडेल किंवा आपल्या चित्तास पसंत पडेल, त्या ठिकाणी बहुतकरून एकांतवासात बसावे;
म्हणौनि तैसें तें जाणावें । मन राहतें पहावें । राहील तेथ रचावें । आसन ऐसें ॥
म्हणून अशी सर्व सोय पाहून त्या ठिकाणी मन स्थिर होते किंवा नाही हे पहावे; आणि स्थिर झाल्यास तेथे आसन घालावे; त्याचा प्रकार असा;
वरी चोखट मृगसेवडी । माजी धूतवस्त्राची घडी । तळवटीं अमोडी । कुशांकूर ॥
वर धूतवस्त्राची घडी असून त्याच्याखाली कृष्णाजिन व त्याच्याखाली साग्र दर्भ असावे.
सकोमळ सरिसे । सुबद्ध राहती आपैसे । एकपाडें तैसे । वोजा घालीं ॥
ते दर्भ कोमल, सारखे आणि आपोआप एके ठिकाणी राहतील अशा चांगल्या तर्हेने जोडलेले असावे.