घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

हां गा स्वप्न लटिकें म्हणों ये । परि निद्रावशें बाणलें होये । तंव आठवु काय देत आहे । आपणपेयां? ॥
असे पहा की, स्वप्न हे खोटे आहे, परंतु ज्या वेळी निद्रेच्या योगाने ते सत्य भासते, त्या वेळेस ते आपली आपल्याला आठवण होऊ देते का?
हें असो डोळ्यांचें । डोळांचि पडळ रचे । तेणें देखणेंपण डोळ्यांचे । न गिळिजे कायी ॥
अथवा डोळ्यांतील पाण्याने उत्पन्न झालेला बडस दृष्टी बंद करीत नाही का?
तैसी हे माझीच बिंबली । त्रिगुणात्मक साउली । कीं मजचि आड वोडवली । जवनिका जैसी ॥
त्याचप्रमाणे माझ्याच ठिकाणी भासलेली सत्व, रज व तम या गुणांनी युक्त अशी माझी छाया (माया) पडद्याप्रमाणे माझ्याच स्वरूपाच्या आड आली,
म्हणौनि भूतें मातें नेणती । माझींच परी मी नव्हती । जैसी जळींचि जळीं न विरती । मुक्ताफळें ॥
म्हणून प्राणी मला जाणत नाहीत आणि माझ्याच पासून उत्पन्न झालेले असून मद्रूप होत नाहीत. ज्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न झालेली मोती पाण्यात विरघळून जात नाहीत.
पैं पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे तरी मेळविजे । एर्‍हवीं तोचि अग्निसंगें सिजे । तरी वेगळा होय ॥
अथवा मातीचा घट करून तो कच्चेपणी मातीस मिळविला असता मिळतो, परंतु तोच विस्तवात भाजल्यावर मिळत नाही,
तैसें भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव । परि मायायोगें जीव । दशे आले ॥
त्याचप्रमाणे, सर्व प्राणी हे माझेच अवयव आहेत; परंतु मायेच्या योगाने जीवपणाला पावले,
म्हणौनि माझेचि मी नव्हती । माझेचि मज नोळखती । अहंममताभ्रांती । विषयांध झाले ॥
म्हणून माझ्यापासून झाले असून मद्रूप होत नाहीत. माझेच असून मला ओळखीत नाहीत, व ‘मी’ आणि ‘माझे’ या भ्रमाने विषयांध झालेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -