कवणी तिया नियमबुद्धि । कैसिया हन उपचारसमृद्धि । कां अर्पण यथाविधि । विहित करणें ॥
कोणत्या नियमाने व उपचारद्रव्याने, तसेच यथाविधि त्याला काय वस्तू अर्पण केल्या पाहिजेत इकडे लक्ष देऊन जे जे उपचार त्याला आवडत असतील ते ते करतात!
पैं जो जिये देवतांतरीं । भजावयाची चाड करी । तयाची ते चाड पुरी । पुरविता मी ॥
परंतु जो जो ज्या ज्या देवतेची फलाकरिता उपासना करतो, त्याची ती इच्छा मीच पुरवितो.
देवोदेवीं मीचि पाहीं । हाही निश्चयो त्यासि नाहीं । भावो ते ते ठायीं । वेगळा धरिती ॥
हे पहा देव देवी मीच आहे; परंतु त्याचा तसाही निश्चय नसतो; म्हणून त्या त्या देवतांचे ठिकाणी त्याचा वेगवेगळा भाव असतो.
मग तिया श्रद्धायुक्त । तेथिंचें आराधन जें उचित । तें सिद्धीवरी समस्त । वर्तो लागे ॥
मग त्यांना ज्या ज्या देवतेची श्रद्धा असेल, त्या त्या देवतेचे आपली कार्यसिद्धी होईपर्यंत ते यथाविधि पूजन करितात.
ऐसें जेणें जें भाविजे । तें फळ तेणें पाविजे । परी तेंही सकळ निपजे । मजचिस्तव ॥
याप्रमाणे ज्याने जे फल इच्छावे ते त्याला प्राप्त होते; परंतु ते सर्व माझ्यापासूनच मिळते.
परी ते भक्त मातें नेणती । जे कल्पनेबाहेरी न निघती । म्हणौनि कल्पित फळ पावती । अंतवंत ॥
परंतु जे भक्त मला जाणत नाहीत; कारण ते आशापाशातून मुक्त होत नाहीत, [त्यातच घोटाळतात] आणि म्हणूनच नाशवंत अशी इच्छित फळे त्यांना प्राप्त होतात.