घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

एर्‍हवीं संकल्पाचिये सांजवेळे । नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे । म्हणौनि अखंडितचि परि झांवळे । भूतभिन्न ऐसें देखे ॥
सहज विचार केला तर कल्पनारूप संध्याकाळच्या वेळी बुद्धीची दृष्टी क्षणभर मंद होते, म्हणून माझे स्वरूप अखंड दंडायमान जरी आहे तरी परंतु ते अस्पष्ट होते व त्या ठिकाणी) भूते निरनिराळी आहेत असे दिसते.
तेचि संकल्पाची सांज जैं लोपे । तैं अखंडितचि आहे स्वरूपें । जैसें शंका जातखेंवो लोपे । सापपण माळेचें ॥
तीच कल्पनारूप संध्याकाळ नाहीशी झाली म्हणजे त्यावेळी मी अखंडदंडायमानच स्वरूपाने आहे. ते कसे तर ज्याप्रमाणे माळेवर होणारी सर्पाची कल्पना जाताक्षणीच, माळेचे सर्पपण जाऊन तिचे मूळ स्वरूप दिसते.
एर्‍हवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ । काय घडेयागाडगेयाचे निघती कोंभ?। परि ते कुलालमतीचे गर्भ । उमटले कीं ॥
भूतभेदाच्या प्रतीतीला पाहणार्‍याचा संकल्पच कारण आहे त्यास दृष्टांत घागर मडकी वगैरेच्या जमिनीतून काय कोम निघतात? नाही ! परंतु कुंभाराच्या बुद्धीने ते सर्व तयार होतात.
नातरी सागरींच्या पाणीं । काय तरंगाचिया आहाती खाणी?। ते अवांतर करणी । वारयाची नव्हे? ॥
किंवा समुद्राच्या पाण्यात लाटांच्या काय खाणी आहेत? तर ते कृत्य वार्‍याचे नाही का?
पाहें पां कापसाच्या पोटीं । काय कापडाची होती पेटी?। तो वेढितयाचिया दिठी । कापड जाहला ॥
हे पाहा कापसाच्या पोटात कापडाचे गठ्ठे आहेत का? वापरणार्‍याच्या समजुतीने तो कापूस कापड बनला आहे!
जरी सोनें लेणें होउनी घडे । तरी तयाचें सोनेंपण न मोडे । येर अळंकार हे वरचिलीकडे । ले तयाचेनि भावें ॥
जर सोन्याचे दागिने बनविले तर सोनेपण नाहीसे होत नाही; बाकी स्थूलदृष्टीने वापरणार्‍याच्या कल्पनेने ते दागिने दिसतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -