घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जळीं चंद्रकेचिया पसरती वेली । ते वाढी चंद्रे नाहीं वाढविली । तेविं मातें पावोनि ठेलीं । दूरी कर्में ॥
पाण्यात वेल पसरल्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश दिसतो. त्याची उत्पत्ती चंद्राने केलेली नाही, त्याप्रमाणे ही कर्मे मजपासून उत्पन्न झालेली असूनही मजपासून दूरच असतात.
आणि सुटलिया सिंधुजळाचा लोटु । न शके धरूं सैंधवाचा घाटु । तेविं सकळ कर्मां मीचि शेवटु । तीं काय बांधती मातें? ॥
ज्याप्रमाणे सागराच्या पाण्याचा लोट वाहू लागल्यावर त्याला मिठाचा बांध आडवू शकत नाही, त्याप्रमाणे माझ्यात लय पावणारी सर्व कर्मे मला कशी बांधू शकतील?
धूम्ररंजाची पिंजरीं । वाजतिया वायूतें जरी होकारी । कां सूर्यबिंबामाझारीं । आंंधारें शिरे? ॥
धुराचा लोट जर वाहणार्‍या वायूस हाक मारून अडथळा करील किंवा सूर्यबिंबात अंधार शिरेल.
हें असो पर्वताचिये हृदयींचें । जेविं पर्जन्यधारास्तव न खोंचे । तेविं कर्मजात प्रकृतीचें । न लगे मज ॥
फार काय सांगावे! ज्याप्रमाणे पर्वताच्या पोटातील द्रव्यांना पावसाच्या अतिवृष्टीनेही काही बाधा होत नाही, त्याचप्रमाणे प्रकृतीच्या कर्मापासून मला काहीएक बाधा होत नाही.
एर्‍हवीं इये प्रकृतिविकारीं । एकु मीचि असे अवधारीं । परि उदासीनाचिया परी । करीं ना करवीं ॥
एर्‍हवी त्या प्रकृतीच्या कार्याला मीच एक कारण आहे असे समज, परंतु उदासीनाप्रमाणे मी काही करीत नाही व करवीतही नाही.
जैसा दीपु ठेविला परिवरीं । कवणातें नियमी ना निवारी । आणि कवण कवणिये व्यापारीं । राहाटे तेंहि नेणें ॥
ज्याप्रमाणे घरात ठेवलेला दिवा अमुक कर किंवा करू नको असे कोणाला सांगत नाही आणि कोण काय व्यापार करितो हेही जाणीत नाही.
तो जैसा कां साक्षिभूतु । गृहव्यापारप्रवृत्तिहेतु । तैसा भूतकर्मीं अनासक्तु । मी भूतीं असें ॥
तो साक्षिभूत असून गृहकृत्यांची प्रवृत्ती होण्यास कारणीभूत होतो, त्याप्रमाणे मी भूतांच्या कर्मामध्ये उदासीन असाच भूतांमध्ये असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -