वाणी ज्ञानेश्वरांची

हा प्रळयोदकें नाप्लवे । अग्निदाहो न संभवे । एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ॥
हा अग्नीपासून जळण्याचा संभव नाही; तसेच वायू याला शुष्क करू शकत नाही.
अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु । सर्वत्र सदोदितु । परिपूर्ण: हा ॥
म्हणून अर्जुना, हा नित्य, क्रियारहित व शाश्वत असून सर्व ठिकाणी सदा, स्वयंप्रकाश व परिपूर्ण आहे.
हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरीटी । ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ॥
हा तर्कशास्त्राच्या दृष्टीने दिसत नाही; ध्यानाला याच्या भेटीची उत्कंठा लागलेली असते;
हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना । नि:सीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु ॥
अर्जुना हा मनास नेहमी दुर्लभ साधनाने प्राप्त न होणारा, अनंत व जीवमात्रांत श्रेष्ठ आहे.
हा गुणत्रयारहितु । अनादि अविकृतु । व्यक्तीसी अतीतु । सर्वरूप ॥
हा निर्गुण, अनादी, विकाररहित, निराकार व वस्तुमात्रांच्या स्वरूपात व्याप्त आहे.
अर्जुना ऐसा हा जाणावा । सकळात्मकु देखावा । मग सहजें शोकु आघवा । हरेल तुझा ॥
अर्जुना, या आत्म्याला असे जाणावे. त्याला सर्वांभूती पहावे म्हणजे मग तुझे हे सर्व दुःख आपोआप नाहीसे होईल.
अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि मानिसी । तर्‍ही शोचूं न पवसी । पंडुकुमरा ॥
अथवा अर्जुना, आत्मा अविनाशी आहे, असे न जाणता तो नाशवंत आहे असे जरी तू मानलेस, तरीदेखील तुला दुःख करण्याचे कारण नाही.
जो आदि-स्थिति-अंतु । हा निरंतर असे नित्यु । जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा ॥
कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह ज्याप्रमाणे अविच्छिन्न असतो, त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थेत आत्मा अखंड व नित्य असतो.