वाणी ज्ञानेश्वरांची

झुंजाची आवडी धरिती | परी संग्रामीं धीर नव्हती | हें सांगोनि रायाप्रती | काय संजयो म्हणे //
यांना युद्धाची हौस आहे खरी, परंतु यांच्याने रणभूमीवर धैर्य धरवत नाही.‘इतके राजाला सांगून संजय पुढे म्हणाला:-
आइका अर्जुन इतुकें बोलिला | तंव श्रीकृष्णें रथु पेलिला | दोहीं सैन्यांमाजीं केला | उभा तेणें //
राजा ऐक. अर्जुनाचे हे भाषण श्रवण करिताच श्रीकृष्णांनी रथ चालविला व दोन्ही सैन्यांमध्ये नेऊन उभा केला.
जेथ भीष्मद्रोणादिक | जवळिकेचि सन्मुख | पृथिवीपति आणिक | बहुत आहाती //
ज्या ठिकाणी भीष्मद्रोणादिक नातेवाईक व अनेक राजे समोर उभे आहेत,
तेथ स्थिर करूनियां रथु | अर्जुन असे पाहातु | तो दळभार समस्तु | संभ्रमेंसी //
त्या ठिकाणी रथ उभा केला असता अर्जुन त्या सेनेकडे उत्सुकतेने पाहू लागला.
मग देवा म्हणे देख देख | हे गोत्रगुरु अशेख | तंव कृष्णमनीं नावेक | विस्मो जाहला //
मग म्हणाला, ‘देवा, पाहा पाहा, हे तर सर्व आमचे आप्तवर्ग व गुरू आहेत!’ हे ऐकून श्रीकृष्णास क्षणभर आश्चर्य वाटले.
तो आपणयां आपण म्हणे | एथ कायी कवण जाणे | हें मनीं धरिलें येणें | परि कांहीं आश्चर्य असे //
ते आपल्या मनात म्हणतात, अर्जुनाने हे मनात का आणले कोण जाणे; परंतु ज्याअर्थी तो असे म्हणत आहे, त्याअर्थी त्यात काही तरी विशेष आहे.
ऐसी पुढील से घेतु | तो सहजें जाणे हृदयस्थु | परि उगा असे निवांतु | तिये वेळीं //
पण भगवान दुसर्‍याचे मनोगत सहज जाणणारे असल्यामुळे त्यांनी पुढील भविष्य जाणले; परंतु त्या वेळेस काहीच न बोलता ते स्तब्ध राहिले.