घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले । इहीं उभयबंधीं सांडिले । पापपुण्यीं ॥
ज्यांची बुद्धियोगाकडे प्रवृत्ती झाली, तेच पार पडतात; आणि पाप व पुण्य या दोहोंच्या बंधनातून मुक्त होतात.
ते कर्मीं तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती । आणि यातायाति न लोपती । अर्जुना तयां ॥
अर्जुना, त्यांनी जरी कर्मे केली, तरी ते कर्माच्या फळाची अपेक्षा करीत नाहीत, म्हणून त्यांच्या जन्ममरणाच्या फेर्‍या संपतात,
मग निरामयभरित । पावती पद अच्युत । ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥
धनुर्धरा, मग बुद्धियोगयुक्त होऊन ब्रह्मानंदाने भरलेले अविनाशी असे पद ते मिळवितात.
तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें यया सांडिसी । आणि वैराग्य मानसीं । संचरैल ॥
जेव्हा तू ह्या मोहाचा त्याग करशील आणि तुझ्या मनात वैराग्य उत्पन्न होईल, तेव्हा तू बुद्धियोगयुक्त होशील.
मग निष्कळंक गहन। उपजेल आत्मज्ञान । तेणें निचाडें होईल मन । अपैसें तुझें ॥
त्या योगाने निर्दोष आणि गहन असे आत्मज्ञान प्राप्त होऊन तुझे अंतःकरण सर्व प्रकारे इच्छारहित होईल.
तेथ आणिक कांहीं जाणावें । कां मागिलातें स्मरावें । हें अर्जुना आघवें । पारुषेल ॥
त्या अवस्थेत आणखी काही ज्ञान मिळवावे किंवा पूर्वी झालेले ज्ञान आठवावे, हे सर्व थांबेल.
इंद्रियांचिया संगती जियें पसरु होतसे मती । ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपीं ॥
इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धि स्थिर होत नसते; ती मग आत्मस्वरूपी स्थिर होईल.
समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्चळ । तैं पावसी तूं सकळ । योगस्थिति ॥
समाधिसुखाचे ठिकाणी जेव्हा तुझी बुद्धि स्थिर होईल, तेव्हाच तुला सर्व योगस्थिती साधेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -