घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

परिस पां सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥
हे सव्यसाची, हा मनुष्यदेह प्राप्त झाला असता उचित कर्म करण्याची ज्यांना खंत वाटते, ते मूर्ख आहेत असे समज.
देखैं असतेनि देहधर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में । जो अखंडित रमे । आपणपांचि ॥
हे पहा, जो पुरुष आत्मस्वरूपामध्ये निमग्न आहे, तो मात्र देहधर्मात असूनही कर्माने लिप्त होत नाही.
जे तो आत्मबोधें तोषला । तरी कृतकार्यु देखैं जाहला । म्हणोनि सहजें सांडवला । कर्मसंगू ॥
कारण, तो आत्मबोधाने संतोष पावलेला असल्यामुळे कृतकार्यच झालेला असतो असे समज. म्हणून तो सहजच कर्मसंगापासून मुक्त होतो.
तृप्ति जालिया जैसीं । साधनें सरती आपैसीं । देखैं आत्मतुष्टीं तैसीं । कर्में नाहीं ॥
ज्याप्रमाणे तृप्ती झाल्यावर तिची साधनेही आपोआप संपतात, त्याप्रमाणे स्वस्वरूपानंदात निमग्न झाल्यावर कर्मेही उरत नाहीत.
जंववरी अर्जुना । तो बोधु भेटेना मना । तंवचि यया साधना । भजावें लागे ॥
अर्जुना, जोपर्यंत अशा प्रकारचे आत्मज्ञान झाले नाही, तोपर्यंत या साधनाचे आचरण करावे लागते.
म्हणौनि तूं नियतु । सकळ कामरहितु । होऊनियां उचितु । स्वधर्में रहाट ॥
म्हणून नेहमी फलाची आशा सोडून देऊन तू उचित अशा आपल्या धर्माचे आचरण कर.
जे स्वधर्में निष्कामता । अनुसरले पार्था । ते कैवल्यपद तत्त्वता । पातले जगीं॥
पार्था, या जगात खरोखर ज्यांनी स्वधर्माचे आचरण निष्कामबुद्धीने केले, ते मोक्षपदास गेले.
देख पां जनकादिका । कर्मजात अशेख । न सांडितां मोक्षसुख । पावते जाहले ॥
हे पहा, कर्माचा मुळीच त्याग न करिता जनकादिक मोक्षपदास गेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -