घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

 

 

- Advertisement -

देखैं उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा । सांगै नरू केवीं तैसा । पावे वेगा? ॥
असे पहा पक्षी एका उड्डाणाबरोबर झाडाच्या फळास धरतो; पण त्याच वेगाने मनुष्यास ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल, सांग बरे?
तो हळूहळू ढाळेंढाळें । केउतेनि एके वेळें । तयां मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥
तो हळूहळू फांदी-फांदीवरून तो मार्ग क्रमिता क्रमिता काही वेळाने फळाजवळ जाऊन पोहोचेल;
तैसें देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें । सांख्य सद्य मोक्षातें । आकळिसी ॥
त्याचप्रमाणे, ज्ञानमार्गाचे जे आचरण करितात, ते ज्ञानी विहंगम मार्गाने तत्काळ मोक्ष प्राप्त करून घेतात.
येरयोगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें । पूर्णता अवसरें । पावते होती ॥
इतर योगी कर्ममार्गाने (पिपीलिकामार्गाने) विहित वर्णाश्रमधर्माने आचरण करून परंपरेने (ज्ञानोत्तरकाली) मोक्ष प्राप्त करून घेतात.
वांचोनि कर्मारंभ उचित । न करितां सिद्धवत । कर्महीना निश्चित । होईजेना ॥
विहित कर्माचा आरंभ केल्यावाचून कर्महीन पुरुषाला एखाद्या सिद्धाप्रमाणे निश्चयाने ज्ञाननिष्ठ होता येत नाही.
कीं प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्य होइजे । हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें ॥
अर्जुना, जी ज्याला विहित कर्मे करावयाची, ती टाकल्याने तो कृतार्थ होईल, असे म्हणणे हा निव्वळ मूर्खपणा होय.
सांगैं पैलतीरा जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे । तेथ नावेतें त्यजावें । घडे केवीं?॥
नदी दुथडी भरून वाहते आहे व ती उतरून पलीकडे जेथे जाण्याची आवश्यकता आहे, तेथे नावेशिवाय जाऊ म्हटले तर कसे जाता येईल, सांग बरे?
ना तरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेनि पाकु न कीजे । कीं सिद्धुही न सेविजे । केवीं सांगैं?॥
किंवा भोजनापासून जो तृप्तीची इच्छा करतो, त्याला स्वयंपाक न करता अथवा तयार असलेले अन्न न खाता ती कशी प्राप्त होईल?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -