घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

परी मूर्खपणें नेणसी । न चिंतावें तें चिंतिसी । आणि तूंचि नीति सांगसी । आम्हांप्रति ॥
परंतु मूर्खपणामुळे तुला हे समजत नाही व ज्या गोष्टी मनातही आणू नयेत त्या गोष्टीचा विनाकारण विचार करून उलट आम्हालाच शहाणपणाच्या गोष्टी सांगतोस.
देखैं विवेकीं जे होती ते । दोहींतेंही न शोचिती । जे होय जाय हे भ्रांती । म्हणौनियां ॥
हे पाहा, जे विचारवंत आहेत, ते जन्म आणि मृत्यू हा भ्रम आहे असे म्हणून दोहोंविषयीही शोक करीत नाहीत.
अर्जुना सांगैन आइक । एथ आम्ही तुम्ही देख । आणि हे भूपति अशेख । आदिकरुनी ॥
अर्जुना, आणखी सांगतो, ऐक. तुम्ही, आम्ही व हे सर्व राजे जे या ठिकाणी जमले आहेत,
नित्यता ऐसेचि असोनी । ना तरी निश्चित क्षया जाउनी । हे भ्रांति वेगळी करुनी । दोन्ही नाहीं ॥
ते असेच राहतील किंवा लयाला जातील हा भ्रम सोडून दिला म्हणजे यापैकी एकही खरे नाही.
हें उपजे आणि नाशे । तें मायावशें दिसे । येर्‍हवीं तत्त्वता वस्तु जें असे । तें अविनाशचि ॥
का म्हणशील तर, उत्पत्ती किंवा नाश जे दिसतात, ते मायेच्या योगाने; एरव्ही खरोखर आत्मा अविनाशीच आहे.
जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहलें । तरी कवण कें जन्मलें । म्हणोंये तेथ ॥
ज्याप्रमाणे वार्‍याने पाणी हलविले आणि ते तरंगाकार बनले, तरी त्यात कोण कोठे उत्पन्न झाले असे म्हणता येईल?
तेंचि वायूचें स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाट जाहलें । तरी आतां काय निमालें । विचारीं पां ॥
बरे तेच वार्‍याचे वाहणे थांबले व पाणी स्वभावतःच स्थिर झाले तेव्हा आता त्यात कशाचा नाश झाला, याचा विचार कर पाहू.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -