वाणी ज्ञानेश्वरांची

 

हे विषय जयातें नाकळिती । तया सुख-दु:खें दोनी न पवती । आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥
जो पुरुष या विषयांच्या स्वाधीन होत नाही त्याला सुख व दुःख ही दोन्ही प्राप्त होत नाहीत; आणि गर्भवासाची संगती घडत नाही (जन्म प्राप्त होत नाही.)
तो नित्यरूप पार्था । वोळखावा सर्वथा । जो या इंद्रियार्थां । नागवेचि ॥
अर्जुना, जो या विषयांच्या पाशात सापडत नाही, तोच अविनाशी आहे, असे तू नि:शंकपणे समज.
आतां अर्जुना कांहीं एक । सांगेन मी आईक । जें विचारपर लोक । वोळखिती ॥
आता, अर्जुना, तुला आणखी एक गोष्ट मी सांगतो, ती ज्ञानी लोक ओळखतात.
या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वगत । तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥
या जगामध्ये सर्वव्यापक असे जे एक गूढ चैतन्य आहे, त्याचेच ग्रहण तत्त्वज्ञ संत करतात,
सलिलीं पय जैसें । एक होऊनि मीनलें असे । परी निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ॥
ज्याप्रमाणे पाण्यामध्ये मिसळलेले दूध राजहंस अगदी वेगळे करतो,
कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ । निवडिती केवळ । बुद्धिमंत ॥
अथवा सोनार अशुद्ध सोने अग्नीत घालून, ताव देऊन शुद्ध सोने अगदी निराळे काढून देतो,
ना तरी जाणिवेच्या आयणीं । करितां दधिकडसणी । मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें ॥
किंवा दही कौशल्याने घुसळल्यानंतर शेवटी जसे लोणी निघालेले दृष्टीस पडते,
कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट । तेथ उडे तें फलकट । जाणों आलें ॥
अथवा धान्य वार्‍यावर धरून पाखडल्यावर ज्याप्रमाणे धान्य खाली राहून फोले उडून जातात.