घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

 

असती कीर्ति जाईल । जगचि अभिशापु देईल । आणि गिंवसित पावतील । महादोष ॥
इतकेच नव्हे, तर तुझ्या कीर्तीचाही नाश होईल व सर्व जग तुझी निंदा करील; आणि अनेक मोठाले दोष तुला शोधीत येतील.
जैसी भातारेंहीन वनिता । उपहती पावे सर्वथा । तैशी दशा जीविता। स्वधर्मेंवीण ॥
ज्याप्रमाणे विधवा स्त्री पदोपदी अपमान पावते त्याप्रमाणेच स्वधर्महीन माणसाची दशा होते;
ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरी गिधीं विदारिजे । तैसें स्वधर्महीना अभिभविजे । महादोषीं ॥
किंवा युद्धभूमीवर पडलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे गिधाडे फाडतात, त्याप्रमाणे स्वधर्महीन मनुष्याला महादोष व्यापून टाकतात.
म्हणौनि स्वधर्मु हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील । आणि अपेश तें नवचेल । कल्पांतवरी ॥
एवढ्याकरिता जर तू तुला प्राप्त झालेल्या क्षत्रियधर्माचा त्याग करशील, तर तुला पाप लागेल आणि कल्पान्तापर्यंतही त्या अपयशाचा डाग धुतला जाणार नाही.
जाणतेनि तंवचि जियावें । जंव अपकीर्ति आंगा न पवे । आणि सांग पां केवीं निगावें। एथोनियां? ॥
जोपर्यंत अपकीर्ति झाली नाही तोपर्यंत ज्ञात्याने जगावे; असे असता तूच सांग की, आता या युद्धातून कसे परत जावे?
तूं निर्मत्सर सदयता । येथूनि निघसी कीर माघौता । परी ते गति समस्तां । न मनेल ययां ॥
या युद्धातून तू दयाळू अंतःकरणाने व मत्सरहित परत फिरलास तरी या सर्वांना काही ती गोष्ट खरी वाटणार नाही.
हे चहूंकडूनि वेढितील । बाणवरी घेतील । तेथ पार्था न सुटिजेल । कृपाळुपणें ॥
हे कौरव तुला चोहीकडून घेरतील व तुझ्यावर बाणांचा मारा करतील; पार्था, मग त्या प्रसंगी या तुझ्या दयाळूपणाने तुझी सुटका होणार नाही.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -