घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आतां इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचें घर रिघावें । मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें ॥
म्हणून, सर्व इंद्रियांनी आपापली कामे सोडून श्रवणाचे ठिकाणी वास करून कृष्णार्जुन संवादरूप गीतेचे सुख घ्यावे.
हा अतिसो अतिप्रसंगें । सांडूनि कथाचि ते सांगें । जे कृष्णार्जुन दोघे । बोलत होते ॥
तेव्हा संतमंडळी ज्ञानेश्वरास म्हणाली की, आता तुझा अप्रासंगिक पाल्हाळ पुरे करून कृष्णार्जुन जे बोलत होते ती कथा आम्हाला सांग.
ते वेळीं संजयो रायातें म्हणे । अर्जुनु अधिष्ठिला दैवगुणें । जे अतिप्रीति श्रीनारायणें । बोलतु असे ॥
त्या वेळेस संजय धृतराष्ट्रास म्हणाला :- दैवसंपतीने युक्त असलेल्या अर्जुनास श्रीकृष्ण अति प्रेमाने म्हणाले :- अति प्रेमाने कशावरून म्हणशील तर,
जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगेचि माते देवकीसी । जें न संगेचि बंधु बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंशीं बोलत ॥
जे गुह्य श्रीकृष्णांनी आपला पिता वसुदेव, माता देवकी व बंधु बलराम यांसही सांगितले नाही, ते अर्जुनास सांगितले.
देवी लक्ष्मीयेवढी जवळिक । परी तेही न देखे या प्रेमाचें सुख । आजि कृष्णस्नेहाचें बिक । यातेंचि आथी ॥
लक्ष्मीदेवी इतकी नेहमी सनिध्य राहणारी पण तिलाहि ज्या प्रेमसुखाचा अनुभव लाभला नाही, त्या कृष्णप्रेमाचे पात्र आज अर्जुन झाला आहे. काय चमत्कार सांगावा!
सनकादिकांचिया आशा । वाढीनल्या होतिया कीर बहुवसा । परी त्याही येणें मानें यशा । येतीचिना ॥
सनकादिक त्याची खूप दिवसांपासून इच्छा करीत होते, पण त्यांनाही इतक्या योग्यतेचे ते प्रेम प्राप्त झाले नाही.
या जगदीश्वराचें प्रेम । एथ दिसतसे निरुपम । कैसें पार्थें येणें सर्वोत्तम । पुण्य केलें ॥
त्याचे ठिकाणी जगदीश्वराचे अनुपमेय प्रेम दृष्टीस पडते, यावरून या अर्जुनाने किती सर्वोत्कृष्ट पुण्य केले असावे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -