Maharashtra Assembly Election 2024
घरसंपादकीयअग्रलेखMaharashtra Assembly 2024 : राजेपण दाखवण्याची संधी

Maharashtra Assembly 2024 : राजेपण दाखवण्याची संधी

Subscribe

आजचा दिवस राज्याच्या राजकारणासाठी आणि १३ कोटी जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मतदाराला राजा असे संबोधले जाते. ते राजेपण दाखवण्याची संधी त्याला आज आहे. राज्यातील ४ हजार १३६ उमेदवार आमदारकीच्या परीक्षेला बसले आहेत आणि राज्यातील ९ कोटी ७० लाख सुजाण लोक म्हणजेच मतदार तब्बल १ लाख १८६ परीक्षा केंद्रांवरून (मतदान केंद्र) या उमेदवारांची उत्तरपत्रिका तपासणार आहेत. त्यातून केवळ २८८ उमेदवार उत्तीर्ण होणार आहेत. दर पाच वर्षांनी निवडणूक होते.

निवडणूक म्हणजे मतदानाचा हक्क जनतेला मिळालेला मोठा अधिकार किंवा मोठी संधी असते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण त्यांना केवळ त्यांचा लोकप्रतिनिधीच निवडायचा नसतो तर जो उमेदवार अयोग्य आहे त्याला त्याची योग्य जागा दाखवण्याची ही संधी असते. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता ही परीक्षा गांभीर्याने घेईल, अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. राज्यातील राजकारण पाच वर्षांत संपूर्ण ढवळून निघाले आहे. निवडून कुणाला दिले, तो नंतर कुठल्या पक्षात गेला, कुणाची सत्ता स्थापन झाली, कुणाचे सरकार पडले या सर्व राजकारणात सामान्य माणसाचा श्वास गुदमरून गेला आहे.

- Advertisement -

२०१९ नंतरचे राज्यातील राजकारण जनतेने यापूर्वी कधीही पाहिलेले नव्हते. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीला खूप महत्त्व आले आहे. महाराष्ट्रात मागील पाच वर्षांमध्ये जी राजकीय उलथापालथ झालेली आहे. राजकीय पक्षांमध्ये फूट पडून नवे पक्ष निर्माण झाले आहेत, त्यामुळे समाजमनसुद्धा संभ्रमित झाले आहे. अशा वेळी योग्य भान राखून आणि सारासार विचार करून मतदारांना मतदान करावे लागणार आहे. लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य अशी लोकशाहीची व्याख्या केली जाते. त्यामुळे लोकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

आमदारांकडून राज्याच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा असते. त्यातही सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यास आणि मंत्री झाल्यास मिळणारे अधिकार वेगळेच असतात. त्यामुळे ‘आमदार व्हायचंय मला’ अशी प्रत्येकाची इच्छा असते, मात्र तिकीट मिळवण्यापासून जी काही तयारी करावी लागते तेव्हापासून अगदी निवडून येईपर्यंत कोणकोणत्या दिव्यातून उमेदवारांना जावे लागते हे तेच जाणतात. बरं हे एवढ्यावरच नसते.

- Advertisement -

उमेदवारी न मिळाल्यास पक्ष सोडण्याची धमकी किंवा बंडखोरी करून अर्ज दाखल करणे किंवा यापैकी काहीही न केल्यास सूड म्हणून विरोधी उमेदवाराला छुपा पाठिंबा हे सर्व खुलेआम सुरू असते. जनतेला हे सर्व दिसत असते, शिवाय माध्यमांमधूनही बर्‍याचशा गोष्टी बाहेर येत असतात. त्यामुळे आपल्या मतदारसंघात कोणते उमेदवार आहेत आणि आपण कुणाला निवडून दिले पाहिजे याची प्रत्येक जण मनात जुळवणी करीत असतो. इथेच खरी मतदारांची परीक्षा सुरू होते.

कारण मतदारांना पैसे, दारू, भेटवस्तू यांची प्रलोभने दाखवली जातात. पैसे घेऊन मतदान केले तर पुढील पाच वर्षे आपला आमदार विकासकामांच्या नावाखाली स्वत:च पैसा खाईल आणि जनतेला अपेक्षित सुविधांपासून वंचित ठेवेल. कारण निवडणुकीत वाटलेला पैसा त्याला वसूल करायचा असतो, एवढे लक्षात ठेवावे. त्यामुळे या प्रलोभनांना न भुलता आणि कोणत्याही दबावाला न जुमानता मतदान करायचे असते. कारण मतदान म्हणजे बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखे असते. एकदा का मतदान झाले की ते मागे घेण्याची किंवा त्यात बदल करण्याची संधी मतदारांना नसते.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या उमेदवाराला मत देणार आहोत तो खरंच आमदार होण्याच्या पात्रतेचा आहे का, याचा विचार प्रत्येक मतदाराने करण्याची नितांत गरज आहे. शिकलेला आणि समज असलेला, अभ्यास करण्याची कुवत असलेला आणि मतदारसंघ सांभाळण्यासाठी प्रचंड वेळ देऊ शकणार्‍या उमेदवाराची निवड सर्वांसाठी खूप महत्त्वाची असते. मुख्य म्हणजे ज्या विधानसभेत कायदे बनवले जातात तिथे प्रवेश करणारा आपला आमदार नियमांचा भंग करणारा, गुन्हेगारी वृत्तीचा नाही ना, याचीही काळजी मतदारांनी घ्यावी अशी अपेक्षा आहे.

नाहीतर निवडणुकीचा निकाल लागल्यावर आलेली माहिती अनेकदा खूपच धक्कादायक असते. त्यात अनेक विजयी आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल झाल्याची आकडेवारी समोर येते. अनेक आमदार मौनी असतात म्हणजे ते ना सभागृहात बोलतात, ना चर्चा करतात, मात्र सभागृहाबाहेर ते शेर असतात. विजयी झाल्यानंतर विकासाबाबत जनतेत पक्षभेद न करणारा आमदार असावा.

म्हणजे ज्या भागात विरोधकांना मते मिळाली तिथल्या विकासकामांना मुद्दाम डावलणारा नसावा. आमदार म्हणून जी शपथ घेतली जाते ती प्रत्यक्षात आणणारा, त्या शपथेचा आदर करणारा आमदार हवा असेल तर प्रत्येकाने यावेळी खूप विचार करणे गरजेचे आहे. सभागृहात मौनी, अधिवेशनाला दांडी मारणारे आणि बाहेर माध्यमांच्या बूमवर बोलणारे खूप लोकप्रतिनिधी आहेत.

म्हणूनच निव्वळ आरोप-प्रत्यारोपांवर न जाता डोळे उघडून पाहा आणि योग्य उमेदवारालाच आपला लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार बनवा. हीच संधी आहे, नाहीतर चुकीच्या उमेदवाराला निवडून दिलेत तर मतदार म्हणून पाच वर्षे तुमच्या मतदारसंघाचा विकास खुंटेल आणि तेवढीच वर्षे तो उमेदवार तुमच्या डोक्यावर मिर्‍या वाटेल. हे टाळायचे असेल तर आवर्जून मतदान करा. विचारपूर्वक मतदान करा आणि एका मताने काय होईल, असा चुकीचा विचार अजिबात मनात आणू नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -