Homeसंपादकीयअग्रलेखWalmik Karad : चोराच्या उलट्या बोंबा

Walmik Karad : चोराच्या उलट्या बोंबा

Subscribe

9 डिसेंबर 2024 हा दिवस राज्याच्या राजकारणातील एक काळा दिवस म्हणावा लागेल. याच दिवशी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. देशमुख हत्यांकाडाला ३५ दिवस झाले आहेत आणि याच घटनेभोवती राज्याचे राजकारण फिरत आहे. यानिमित्ताने बीड-परळीतील खंडणी, गुंडगिरी, दादागिरी आणि अनेक घटनांचे आधुनिक शिल्पकार आणि थोर समाजसेवक वाल्मिक कराड याची महाराष्ट्राला ओळख झाली.

त्याचे कुणाकुणाशी घनिष्ठ संबंध आहेत, त्याचे कोणते धंदे चालतात हे सर्व जगासमोर आले. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा घरगडी ते शेकडो कोटींचा मालक असा प्रवास करणार्‍या या समाजसेवकाचे एकेक कारनामे ऐकून लोकांचे डोळे विस्फारले आहेत. अशातच मंगळवारी वाल्मिक कराडची आई आणि इतर महिलांनी परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या करून आपला मुलगा निर्दोष असल्याचा अजब दावा केला आहे.

सकाळी 11 वाजता त्यांनी आंदोलन सुरू केले. हे कमी म्हणून की काय वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाले. कराडवर खोटे गुन्हे दाखल झाल्याचा दावा करीत त्याला सोडण्याची मागणी करण्यासाठी त्यांनी परळीत अनेक ठिकाणी आंदोलने केली आहेत. कराडची पत्नीही आंदोलनात उतरली आहे. संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत थंड डोक्याने आणि क्रौर्यालाही लाजवेल अशी करण्यात आली. त्याचा व्हिडीओ सीआयडीनेही पाहिला आहे.

या प्रकरणातील 8 आरोपींवर मकोका लावण्यात आला असला तरी वाल्मिक कराडवर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरून आरोपीवर मेहेरबानी केली जात असल्याचा गंभीर आरोप होत होता. ज्या आरोपीचे काळे कारनामे समोर येत आहेत अशा या कथित थोर समाजसेवकाच्या समर्थनासाठी शेकडो लोक रस्त्यावर येत असतील, त्याच्यासाठी आंदोलन करीत असतील, तर महाराष्ट्रातील राजकारणाने किती खालची पातळी गाठली आहे हे यातून स्पष्ट होते.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तब्बल 21 दिवस फरार असलेल्या वाल्मिक कराडने 31 डिसेंबर रोजी पुण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. वॉण्टेड आरोपीसाठी एवढी पथके नियुक्त करूनही तो पोलिसांना सापडू नये हेच पोलिसांचे पहिले अपयश होते. खंडणी प्रकरणात कराडला केज कोर्टाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आताही १० दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात येत होती, मात्र 14 दिवसांत काय केले, असा सवाल केज कोर्टाने करीत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

त्यानंतर एसआयटीने डाव टाकला आणि कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोकाचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे कराडचा पाय आता खर्‍या अर्थाने खोलात गेला आहे. एवढ्या मोठ्या आरोपीवर मकोका आणि ३०२ चा गुन्हा दाखल न केल्यामुळे कराडला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप वारंवार होत होता. वाल्मिक कराडला वाचवून प्रत्यक्षात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे याकडेही लक्ष वेधले जात आहे.

भाजप आमदार सुरेश धस, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडचे सर्व कारनामे बाहेर काढले आहेत. त्यानंतर तब्बल 35 दिवसांनी कराड समर्थकांनी परळीत जोरदार आंदोलन करून कराडवरील आरोप हा कटकारस्थानाचा डाव असल्याचा दावा करून खळबळ उडवली. एवढेच नाही तर कराड समर्थकांनी आमदार धस, क्षीरसागर यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन केले.

टाकीवर चढून कराडचे समर्थन केले. रस्त्यावर टायर जाळून कराड कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एवढे दिवस शांत असलेले वाल्मिक समर्थक मंगळवारी अचानक कसे काय रस्त्यावर उतरले, वाल्मिकची आई पोलीस ठाण्यासमोर आंदोलनाला बसली आणि मुलगा वाल्मिक देवमाणूस असल्याचा टाहो फोडला. परळी शहर आपोआप बंद झाले. हे सर्व अचानक कसे घडले याची पोलिसांनी गंभीर दखल घ्यायला हवी. ही एक प्रकारची वाल्मिक कराडची दहशत आहे.

त्यातून पोलिसांवर तसेच राजकीय नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे. गंभीर बाब म्हणजे कराडची आई आणि पत्नीने या प्रकरणात जातीयवाद आणला आहे. खंडणी प्रकरणात कराडला मंगळवारी न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्याचबरोबर त्याच्यावर हत्या प्रकरणात मकोकाचा गुन्हा दाखल करण्यात आला हे चांगले झाले. त्यामुळे वाल्मिक कराडचा ताबा आता खर्‍या अर्थाने एसआयटीकडे आणि सीआयडीकडे येईल.

यातून संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी होईल. कराडची चौकशी होऊन या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणून काढता येतील. या प्रकरणाचा तपास व्यवस्थित झाला तर पोलिसांची विश्वासार्हता वाढेलच, शिवाय बीड-परळीतील छुपी गुंडगिरीही मोडून निघेल, मात्र कराड समर्थकांनी परळीत रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन, आत्मदहनाचा प्रयत्न, कराडच्या आई-पत्नीचे आंदोलन यामुळे या चौकशीला कुठलीही बाधा येऊ नये एवढीच अपेक्षा आहे.