HomeसंपादकीयओपेडMarathi Literature Conference : मराठी साहित्य संमेलनांची फलनिष्पत्ती काय?

Marathi Literature Conference : मराठी साहित्य संमेलनांची फलनिष्पत्ती काय?

Subscribe

नवी दिल्लीत यंदाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी सहित्य संमेलन होणार आहे. नुकतेच विश्व मराठी साहित्य संमेलन झाले. मराठी भाषेचा विकास, संवर्धन, वाचन संस्कृतीची चिंता, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर आता पुढे काय? यावर चर्चा होईल. मराठी साहित्याची सद्यस्थिती या विषयांवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र मराठी साहित्य, मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी प्रकाशन व्यवसायासमोरील आव्हाने या प्रश्नांवर अशा संमेलनांतून खरंच समाधानकारक उत्तरे मिळतात का? हा प्रश्न आहेच.

वेळोवेळी झालेल्या टीका टिप्पणीतून या मराठी भाषेच्या संमेलनांमध्ये खरंच सुधारणा झाली आहे का, हे शंभर वर्षांची परंपरा पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असलेले मराठी संमेलन सर्वसमावेशक झाले आहे का? समाजातील सर्व स्तरांना यात प्रतिनिधीत्व मिळते का? मराठी साहित्य आणि संस्कृती तसेच समाज आणि मराठी भाषा संस्कृतीच्या अनुषंगाने पुढे येणारे राजकीय-अराजकीय विषय यावर अशा संमेलनांनी कितपत परिणाम केला आहे? याचा विचार होण्यासाठी अशी संमेलने आवश्यक आहेत, परंतु त्याची निष्पत्ती स्पष्ट असायला हवी, साहित्याला अभिव्यक्तीपासून तोडता येणार नसते तसेच अभिव्यक्तीलाही साहित्यापासून दूर करता येणार नसल्याने अशी संमेलने राजकीय प्रभावापासून दूरच असायला हवीत. केवळ विशिष्ट वर्तुळातले साहित्यिक, राजकीय नेत्यांचे सत्कार समारंभांपलीकडे अशा साहित्य संमेलनातून मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी खरंच काही ठोस निष्पन्न होते का?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाशी समांतर असणारी विद्रोही साहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलन, स्त्रीवादी साहित्य संमेलने मराठीची गरज आहे. विचारांमधील मतभेद जरी असले तरी ‘मराठीचा विकास’ हे सामाईक उद्दिष्ट साध्य होण्याबाबत दुमत नसावे. साहित्य संमेलनांना सरकारी अनुदानाची गरजच काय? यामुळे साहित्याच्या क्षेत्रात राजकारणाचा शिरकाव होत असल्याचा आक्षेप खराही आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर त्यातून येणार्‍या काळात मराठीजनांसाठी अर्थार्जनाच्या किती संधी उपलब्ध होणार आहेत? ‘भाकरी आणि पुस्तक’ या द्वंद्वातून मराठी वाचकांची काही अंशाने लेखकांचीही सुटका होणार आहे का? असे कित्येक प्रश्न या निमित्ताने यंदाही उपस्थित होतील.

मूलभूत माणूसपणापासून मराठी साहित्य दूर होतंय का किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञान, समाजमाध्यमांच्या युगात मराठीचे स्थान काय, आदी अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेतच, हे नवे प्रश्न समोर असताना मराठी साहित्य, भाषा, प्रकाशक, वाचक आदींचे परंपरागत प्रश्नही अद्याप सुटलेले नाहीत. अशा संमेलनाचे नेमके फलित काय? हा प्रश्न जुनाच आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर अर्थार्जनाच्या संधीसाठी मराठी भाषा किती उपयोगी आहे याचा विचारही मांडला जात आहे. साहित्य, प्रमाणभाषा, व्याकरण, बोली भाषेच्या वादात मराठी ज्ञानभाषा म्हणून कितीशी उरली आहे. मराठी भाषा आणि मराठीजन यांच्या समस्या मराठी साहित्य संस्कृतीतून सोडवल्या जाऊ शकतील काय? आदी अनेक प्रश्न समोर आहेत.

एका मराठी माणसाने दुसर्‍याशी मराठीतूनच बोलायला हवे, इतकी प्राथमिक सुरुवात शेकडो वर्षांच्या मराठी भाषेबाबत आज महाराष्ट्रातच करावी लागत आहे. मराठीजनांमध्ये भाषक म्हणून ऐक्य आहे काय? मराठी बोलीभाषेची हेटाळणी करणारे आणि शुद्ध मराठीचा आग्रह धरणारे दोन्हीही मराठीजनच आहेत. म्हणजे मराठीजनांचेच दोन वर्ग पडले आहेत. भाषेसह संस्कृती, इतिहास, कला आणि साहित्यही सोबत येतेच. यांना विलग करता येणे शक्य नसताना मराठीजनांमध्येच असलेली सांस्कृतिक, जात, वर्गातली दरी सांधण्याची आवश्यकता साहित्य संमेलनातून चर्चिली जात नाही. भाषा माणसांना जवळ आणते, त्यांच्या संवादाचा बंध जोडते, मराठी भाषेमुळे महाराष्ट्राच्या विविध भागात असा अतूट बंध खरोखरच जोडला गेला आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्वर, तुकारामांपासून ते नामदेव ढसाळांपर्यंत मराठीतला अखिल मानवतावाद गाळून मराठीची चर्चा करणे गैरलागू आहे, मग अशी संमेलने सातासमुद्रापार भरवली तरी त्यातून पुरेसे काही हाती लागणे कठीण असाच सूर मराठी साहित्य, ग्रंथ व्यवसायातून व्यक्त होत आहे.

साहित्य संमेलन हे अखिल भारतीय असल्या कारणाने काही वेळा महाराष्ट्राबाहेर भरवले जाते. ही संमेलने वादाचाच विषय राहिली आहेत. महाराष्ट्रात मराठी मुलेच मराठी साहित्य वाचत नाहीत ही शोकांतिका आहे. महाराष्ट्रात राहूनच स्वतःचा विकास साधलेले अमराठी रोजच मराठी भाषा आणि मराठी भाषकांवर अन्याय करीत आहेत. असे असताना परदेशात अशी संमेलनं भरवून त्याची फलश्रुती काय? साहित्यातून माणूस जोडला जातो, त्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील अशा संमेलनातून कोणता उद्देश साध्य होईल, याचे उत्तर संयोजकांनाच माहीत असावे, असे मराठी ग्रंथपरीक्षक प्रदीप जाधव म्हणाले.

मराठी पुस्तक प्रकाशन व्यवसायासमोर मोठ्या आर्थिक अडचणी आहेत. अनेक प्रकाशने बंद होण्याच्या मार्गावर आहेत, तर काहींनी आपले काम अत्यंत मर्यादित स्वरुपात ठेवले आहे. मराठी वाचक कमी झाल्याने ते वाढावेत आणि प्रकाशन व्यवसायाला सुगीचे दिवस यावेत, यासाठी अशा साहित्य संमेलनातून धोरणात्मक निर्णय होत नाहीत, त्यामुळे ठोस काही हाती लागत नाही. संमेलनात केवळ जत्रेसारख्या प्रकाशन, साहित्याशी संबंधितांच्या भेटीगाठी होतात. मागील धाराशिवच्या साहित्य संमेलनात प्रकाशन व्यवसायातील स्टॉल्सना मोठा तोटा सहन करावा लागला. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या वाचकांनीही पुस्तके विकत घेतली नाहीत.

यंदा दिल्लीत साहित्य संमेलन होणार आहे, त्यासाठी मुंबईहून साहित्यिक, प्रकाशकांना येण्याजाण्याचे तिकीट, राहाण्याची व्यवस्था, जेवणखाणं असा खर्च परवडणारा नाही. स्टॉलचा खर्च, संमेलनात प्रकाशकाला दिलेल्या जागेचे भाडे यंदा साडेतीन हजार रुपये असल्याची चर्चा ऐकली आहे. हे परवडणारे नाही. त्यामुळे किरकोळ आणि छोटे प्रकाशक संमेलनात फिरकणार नाहीत. दिल्लीसारख्या मराठीबहुल नसलेल्या ठिकाणी मराठी पुस्तके किती विकली जातील याबद्दल शंका आहे. त्यामुळे जेवणावळी, पाहुणे, मान्यवर आणि राजकीय नेत्यांच्या स्वागतसमारंभात तसेच भव्य दिव्य कार्यक्रम यावरच होणारा खर्च नियंत्रणात आणायला हवा.

मराठी साहित्य जगवण्यासाठी ठोस मुळापासून प्रयत्न व्हायला हवेत. सरकारी अनुदान मिळत असल्याने मराठी साहित्य आणि प्रकाशन व्यवसायाच्या डबघाईची खरोखरच गंभीर चर्चा टाळली जाते, राजकारणाच्या ताब्यात साहित्याचा मंच गेल्याने मराठीची चर्चा बाजूला पडून मंचाचा राजकीय आखाडा बनतो. राजकारण्यांनी साहित्यरसिक म्हणून पहिल्या रांगेत बसावे, मंचावर केवळ आणि केवळ मराठी अभ्यासक, संशोधक आणि साहित्यिकांचीच उपस्थिती, चर्चा असायला हवी, असे अक्षर प्रकाशनचे चंद्रकांत माळगवे यांनी सांगितले.

साहित्य संमेलनात नेलेल्या पुस्तकांचे गठ्ठे न फोडताच पुन्हा आणावे लागतात. कवितासंग्रह, नाटके, कथासंग्रहाला प्रकाशक मिळत नाहीत, मनोरंजन आणि उथळ मजकूर विकला जातो. दर्जेदार लेखन करणार्‍यांना अशा साहित्य संमेलनांचा उपयोग नसतो, असा नाराजीचा सूर काही साहित्यिक आणि प्रकाशन व्यावसायिकांनी मांडला. तर संमेलनांना जवळपास तीस हजार साहित्यरसिक भेट देतात. पिशवी भरभरून पुस्तके नेतात, नव्या साहित्यिकांना प्रेरणा मिळते. आवडत्या साहित्यिकांशी चर्चा संवाद करता येतो, एरवी भेटीगाठी कठीण असतात. साहित्यावर मंथन होतेच. मराठी साहित्याविषयी विविध चर्चा परिसंवादातून भाषेच्या विकासासाठी ठोस दिशा मिळते. मराठी भाषेसाठी असलेले सरकारचे धोरण दुरुस्त करण्याचीही संधी असते, असाही सकारात्मक सूर काही मराठी साहित्यरसिक आणि प्रकाशकांनी लावला. परंतु मराठी प्रकाशन आणि साहित्यक्षेत्रात व्यावसायिकता मुरायला हवी, असेही ते म्हणाले.

काही मान्यवर मराठी साहित्यिकांनी संमेलनातील खर्चाबाबत मत मांडले आहे. कवी कट्ट्यात सहभागी होणे, येण्याजाण्याचा खर्च असा एकूण दहा ते बारा हजारांचा खर्च येणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून कामाची सुट्टी काढून येणार्‍या छोट्यामोठ्या साहित्यिकांना हा खर्च परवडणार आहे का? संमेलनातील वाद नवे नाहीत, परंतु ठोस मुद्यावर आणि मराठीच्या हितासाठी असे वाद पोषक ठरायला हवेत. संमेलनाच्या आयोजकांकडून नवोदित साहित्यिकांचा विचार होताना दिसत नाही. पुस्तकांच्या दरात सवलत पुरेशी नसल्याने ग्रंथखरेदीलाही मर्यादा येतात. पुस्तकांचे, स्टॉलचे काही कारणाने नुकसान झाल्यास प्रकाशकाला मोठा आर्थिक फटका बसतो. साहित्य संमेलनाचा कणा लेखक असताना त्याच्याकडेच होणारे दुर्लक्ष मराठीसाठी हितावह नाही.