दुभंगली धरणीमाता फाटले आकाश गं
कधी संपणार नारी तुझा वनवास गं
प्रत्येक बाईला आपलासा वाटेल असा चित्रपट म्हणजे अलका कुबल यांचा ‘माहेरची साडी’. वर उल्लेख केलेल्या ओळी या याच चित्रपटातल्या. १९९१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा ज्या संदर्भात या ओळी लागू होत होत्या, त्या परिस्थितीत आज काही फार बदल झाला आहे, असे दिसत नाही. आजच्या काळातही या ओळी कमी अधिक फरकाने अशाच लागू होतात. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे, नुकतीच पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे घडलेली एक घटना.
पालघर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील रुग्णवाहिका व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे एका गर्भवतीसह तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच बुधवारी, २७ नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आणि संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणीदेखील होऊ लागली. नेहमीप्रमाणे सगळ्याच राजकीय पक्षांनी यावर भाष्य केले.
जे सत्तेत आहेत त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले तर जे विरोधात आहेत त्यांनी नेहमीप्रमाणे सत्ताधार्यांवर टीकेची झोड उठवली. पण, या सगळ्यात दुर्लक्षित घटक ठरला तो म्हणजे ती महिला, तिचं जन्मालादेखील न आलेलं बाळ आणि त्यांचा परिवार.
सोयी-सुविधांचा अभाव असल्याने अशा घटना केवळ ग्रामीण भागातच घडतात असे काही नाही, तर काही महिन्यांपूर्वी मुंबई उपनगरातदेखील अशीच एक घटना समोर आली होती. उपनगरातील भांडुपच्या सुषमा स्वराज पालिका प्रसूतिगृहामध्ये ही घटना घडली. प्रसूतीच्या दरम्यान रुग्णालयातील विद्युत प्रवाह अचानक खंडित झाला. त्यामुळे डॉक्टरांवर थेट टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती करण्याची वेळ आली.
यात नवजात बाळाचा मृत्यू तर झालाच पण त्या गर्भवतीची तब्येत बिघडल्याने तिला सायन येथील रुग्णालयात भरती केले होते. मात्र, तिचा जीव वाचू शकला नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मात्र, पालिकेच्या या भोंगळ कारभाराने ही गर्भवती आणि नवजात शिशूचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. तेव्हाही कमी अधिक प्रमाणात अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या.
उत्तर प्रदेशातील झाशी येथील वैद्यकीय महाविद्यालयात नुकत्याच लागलेल्या आगीत १० बाळांचा मृत्यू झाला तर काही वर्षांपूर्वी भंडार्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये आग लागल्याने १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा अनेक घटना सांगता येतील आणि दुर्दैवाने या सगळ्या घटनांमध्ये जर काही पणाला लागत असेल तर ते त्या आईचं आईपण.
अशा प्रकारे काहीतरी अडचण येऊन बाळ-बाळंतिणीचा मृत्यू होणे ही काही पहिलीच घटना नाही. पूर्वीच्या काळात साधनांची कमतरता, डॉक्टर्सचा अभाव, दळणवळणाची तुटपुंजी साधने यामुळे अशा घटना घडत होत्या. पण, आज आपण एकविसाव्या शतकात आहोत. मानवी रोबोकडून कामं करून घेण्यापासून ते आर्टिफिशिअल इंटलिजन्सपर्यंत आपली प्रगती झाली आहे. पण, या साध्या गोष्टींवर तोडगा काढणे काही आपल्याला शक्य होत नाहीये.
अनेक त्रास सहन करून एखादी बाई आपल्या बाळाला जन्म देत असते. नऊ महिने आपल्या पोटात बाळाला जपून, जगापासून सांभाळून त्याला सुखरूपपणे जगात आणण्याचा प्रत्येक आईचा प्रयत्न असतो. म्हणूनच तर बाळंतपण हा कोणत्याही बाईचा पुनर्जन्म मानला जातो. पण, नऊ महिने जगापासून आपल्या बाळाला वाचविणार्या आईला बाळ जगात आणताना मात्र त्याचे रक्षण करणे कठीण जाते, ही किती दुर्दैवी गोष्ट आहे.
या परिस्थितीसाठी निव्वळ व्यवस्थेची निष्क्रियता आणि सरकारी उदासीनता जशी कारणीभूत आहे तशीच समाजाची आणि विशेषत: स्त्रियांची मानसिकता बदलण्याचीदेखील गरज आहे. समाजाची मानसिकता यासाठी की, प्रत्येक कुटुंबाचा आधार असलेली स्त्री ही तिच्या स्वत:च्या आरोग्याबाबतीत कायमच उदासीन असते, हे वास्तव आहे. आपली व्यवस्थाच अनेकदा महिलांना स्वत:चा विचार करण्याची, स्वत:साठी जगण्याची किंवा स्वत:कडे लक्ष देण्याची मुभा देत नाही.
या परिस्थितीत बदल झाला असला तरी ती पूर्णपणे बदललेली नाही, हेदेखील तितकेच खरे आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांप्रती आपापल्या जबाबदार्या पूर्ण करताना महिला आपल्या स्वत:च्या आरोग्याकडे, अधूनमधून डोकं वर काढणार्या तब्येतीच्या कुरबुरींकडे दुर्लक्ष करताना दिसतात. कुटुंबीयांची काळजी घेताना या गृहिणी स्वत:च्या आरोग्याची हेळसांड करतात. आणि याचे परिणाम त्यांना नंतर भोगावे लागतात.
बाळाला जन्म देणे हा प्रत्येक स्त्रीसाठी तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. बाळाला जन्म देणे आव्हानात्मक असते. या कालावधीत महिला शरीराने आणि मनाने थकतात. गर्भावस्थेतील महिलांच्या स्वभावात निरनिराळे बदल घडून येतात. पहिल्यांदाच गर्भवती होणार्या महिला गर्भावस्थेत असताना अत्यंत तणावाखाली असतात. मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि नाडीचे ठोके वाढतात. त्याचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो. शरीरातील या सगळ्या बदलांची संपूर्णपणे माहिती ग्रामीण भागातील महिलांना असतेच असं नाही.
त्याची जाणीव त्यांना करून देणे आणि त्याप्रमाणे त्यांना वागणूक देणे हा या व्यवस्थेतला अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. कारण आई सुदृढ तर बाळही निरोगी. ही झाली समाज म्हणून आपली जबाबदारी. याची दुसरी देखील एक बाजू आहे, आणि ती आहे प्रशासकीय. तीदेखील तेवढीच महत्त्वाची आहे. कारण, व्यक्तिगत दुर्लक्षामुळे अशा घटना घडतातच पण सोयीसुविधांचा अभाव, वैद्यकीय सोयी आणि दळणवळणाची साधने यामुळे देखील असे त्रास होण्याचे प्रमाण बरेच आहे.
वर आपण ज्या काही घटनांचे उल्लेख केले आहेत, त्या सगळ्या या प्रशासकीय गैरसोयीतून किंवा हलगर्जीपणातून घडलेल्या घटनाच म्हणाव्या लागतील. स्वातंत्र्य मिळून आपल्याला जवळपास ७७ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि एवढ्या वर्षांनंतरही जर आपण दुर्गम भागांमध्ये पायाभूत आणि वैद्यकीय सुविधा पुरवू शकत नसू, त्याचा पुरेसा पुरवठा करू शकत नसू, प्रशिक्षित आणि पुरेसे डॉक्टर देऊ शकत नसू, तर इतक्या वर्षात यंत्रणेने काय केले हा प्रश्न पडतोच.
आजही पावसाळ्यात आपल्याकडील अनेक भागांचा संपर्क तुटतो. त्यामुळे मुख्य भागापासून ही गावे एकदम तुटली जातात. मग अशा वेळी कोणतीही वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती आली किंवा गर्भवतीचे बाळंतपण करायचे असेल तर अनेक प्रश्न समोर उभे ठाकतात. त्यामुळे अशा वेळी झोळीतून गुडघाभर पाण्यातून रुग्णाला घेऊन जाण्याची दृश्ये काही आपल्याला नवीन नाहीत. ही दृश्ये पाहून आपण केवळ हळहळतो आणि दुसर्या दिवशी ते विसरूनही जातो.
मात्र, यात बदल करण्यासाठी कधी पुढाकाराने काही करण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही एकट्याने याचा विचार करून काय होणार, एकामुळे किंवा एका रात्रीत ही परिस्थिती बदलणार आहे का, असा आपला त्यावरचा नेहमीचा बचावात्मक पवित्रा ठरलेला आहेच. पण कुठूनतरी आणि कोणीतरी याची सुरुवात करणे गरजेचे आहेच. नेहमीप्रमाणे या सगळ्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची.
आज महिलांची भविष्याची तरतूद म्हणून किंवा त्यांना आर्थिक मदत म्हणून सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सरकारला तारणारी लाडकी बहीण योजना तर त्यात सर्वाधिक लोकप्रिय. या योजनांना महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोही. सरकारी यंत्रणेकडून होणारे हे उपक्रम स्तुत्य आहेतच.
आर्थिक मदत ही गरजेची आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन आवश्यकता आहे ती तळागाळापर्यंत पोहोचून महिलांशी बोलण्याची, शासकीय मानसिकता बदलण्याची आणि त्यांच्यापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचतील याची व्यवस्था करण्याची. काही काळापूर्वी वाचनात एक लेख आला होता. त्यात एक सुंदर वाक्य होते. देशाच्या सामाजिक आरोग्याची गुणवत्ता ही त्या देशातील महिलांना मिळणार्या वागणुकीवर ठरते, असा त्याचा आशय होता. किती सुरेख वाक्य आहे हे. एका वाक्यात महिलांप्रती समाजाची जबाबदारी काय आहे, हे सहजरित्या सांगणारे.