बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. तेव्हापासून बीडमधील दहशत जगासमोर येऊ लागली आहे. या संदर्भातील रोज नवनवे पुरावे समोर येत आहेत. या हत्येतील वाल्मिक कराड याची कोणत्या राजकीय नेत्यांशी जवळीक आहे आणि त्याच्या राजकीय दहशतवादाची बीजे किती खोलवर रुजली आहेत, हे रोज माध्यमांमुळे समोर येत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणाचा पहिल्यापासून जोरदार पाठपुरावा केल्यामुळे आणि दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि अलीकडेच दुसर्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही या दहशतवादाविरोधात आवाज उठवल्याने हे प्रकरण अजित पवारांच्या अंगलट येऊ लागले आहे. एवढे होऊनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली जात आहे.
२७ जानेवारीला अंजली दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधांबाबत पुरावे दिले आहेत. अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख म्हणून भेट घेतल्याचे दमानिया यांनी स्पष्ट केले हे खूप महत्त्वाचे आहे.
याचाच अर्थ पक्षप्रमुख म्हणून मुंडे यांचा राजीनामा घ्या, असा होतो. त्यावर अंजली दमानिया यांनी दिलेले पुरावे मुख्यमंत्री फडणवीसांकडे देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. तरीही प्रश्न उपस्थित होतो की, एवढे गंभीर आरोप होऊनही धनंजय मुंडे यांच्यावर मेहेरबानी का केली जाते? यावर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगून चौकशी सुरू आहे. चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करून तोंडी आरोपांना किंमत नसल्याचे दाखवून दिले आहे.
वाल्मिक कराड हा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी घरगडी होता. आज त्याच्याकडे शेकडो कोटींची मालमत्ता कुठून आली, दोन पत्नी आणि त्यांच्या नावे कोट्यवधींची संपत्ती, ड्रायव्हरच्या नावाने मालमत्ता हे सर्व सामान्य माणसाला अचंबित करणारे आहे. बीडमधील राखेचे राजकारण, अनेक हत्याकांड यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दीड महिन्यांत अनेकदा गौप्यस्फोट केले आहेत. तरी सरकारकडून फक्त चौकशी सुरू आहे, या थाटाची उत्तरे देणे सुरू आहे.
दीड-दोन महिन्यांपूर्वी बीड-परळीची गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांचा जिल्हा तसेच मतदारसंघ अशी ओळख होती. मात्र, आता बीड जिल्ह्याचा रक्तरंजित इतिहास समोर येत असल्याने त्याची वेगळीच ओळख पुढे येत आहे. बीडमधील पोलीस अधिकारी आणि वाल्मिक कराड यांचे कथित संभाषण व्हायरल होत आहे. त्यानंतर वाल्मिक कराड संबंधित पोलिसांची नावे तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली आहेत.
अशातच बीड जिल्हा रुग्णालयाचे डॉ. अशोक थोरात हेदेखील आरोपामध्ये सापडले आहेत. त्यांच्यावर संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालाबाबत अंजली दमानिया यांनी संशय व्यक्त केला आहे. डॉ. थोरात यांचे अंबेजोगाईमध्ये टोलजंग हॉटेल आहे. यापूर्वी पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलण्यात थोरात होते. हे पाहता दमानिया यांचा आरोप सहज फेटाळता येण्यासारखा नाही. याशिवाय धनंजय मुंडे यांचा जनता दरबार कोण चालवायचा हेदेखील समोर आले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तब्बल २१ दिवस फरार असलेल्या वाल्मिक कराडने ३१ डिसेंबर रोजी पुण्यात पोलिसांसमोर शरणागती पत्करली. या प्रकरणात एसआयटी स्थापन झाली आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर गेली असल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकरणात प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस सतत धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी करत आहेत. याबाबत अजित पवार म्हणतात, माझे भाजपच्या नेत्यांशी बोलणे झाले आहे. म्हणजेच ते सुरेश धस यांना आणि धस करत असलेल्या आरोपांना काहीही किंमत देत नाहीत.
त्याचवेळी धस यांना मुख्यमंत्रीदेखील रोखताना दिसत नाहीत. त्यामुळे पडद्यामागे काही वेगळ्या घडामोडी सुरू आहेत का, हेही कळायला मार्ग नाही. त्याचवेळी राजकारण खूपच खालच्या थराला जात आहे, गुन्हेगारीला राजकीय आश्रय तर मिळत नाही ना, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार पक्षप्रमुख म्हणून अजित पवार आणि मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचा आहे, पण मुंडे म्हणतात, यातील कुणीही त्यांचा राजीनामा मागितलेला नाही.
बीडमध्ये नक्की काय सुरू आहे, पुढे काय होईल, हे समजणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. म्हणूनच धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेतल्यास जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या भेटीनंतर दुसर्याच दिवशी दिला आहे. अजित पवार जरी त्यांच्या पक्षातील नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असले तरी मुख्यमंत्री या नात्याने सरकारची प्रतिष्ठा राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना ठोस निर्णय घ्यावा लागेल.