Maharashtra Assembly Election 2024
घरसंपादकीयअग्रलेखWho Is Next Maharashtra CM : कोण होणार मुख्यमंत्री!

Who Is Next Maharashtra CM : कोण होणार मुख्यमंत्री!

Subscribe

राज्याची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाची शर्यत सुरू झाली आहे. भाजपला मिळालेल्या विक्रमी आणि न भूतो न भविष्यती बहुमताने विरोधकांचे तसेच प्रादेशिक पक्षांचे राजकारण गडबडले आहे. मात्र या त्सुनामीतून सत्ताधारी भाजपचे मित्र पक्षही सुटणार नाहीत, असे चित्र आहे. राज्यातील विधानसभेचा निकाल विरोधकांसोबतच सत्ताधार्‍यांनाही अचंबित करणारा त्यामुळेच ठरला आहे. याचे विश्लेषण राजकीय अभ्यासकांकडून केले जात असताना या बहुमताची कारणे मांडली जातील आणि त्याचे परिणाम पुढील पाच वर्षात दिसून येतील.

राज्याच्या विकासासाठी स्थिर सरकार महत्त्वाचे आहे. पुढील पाच वर्षे ही स्थिरता कायम ठेवण्यासाठी १३२ हा आकडा भाजपासाठी पुरेसा आहे. उरलेल्या १४ जागा या निवडणुकीत इतर लहान माशांना गिळंकृत करणार्‍या या महाकाय शार्कसाठी ‘तोळामासा’ आहेत. बंडखोरीची भीती भाजपाला गेल्या विधानसभेतही नव्हती, ती होती त्याच्या मित्र पक्षांना, त्यामुळे घोडेबाजार किंवा आमदारांच्या हॉटेल बुकींगची शक्यताही या स्पष्ट बहुमतामुळे संपुष्टात आली आहे. मावळलेल्या विधानसभेत भाजपच्या बाजूने उभे राहण्यासाठी मित्रांना तपास यंत्रणांची भीती दाखवली होती. अशी भीती दाखवण्याची गरज आता भाजपला उरलेली नाही. कारण बहुमताचा आकडा अगदी जवळ आहे. विरोधकांना ही भीती कायम असेल. मित्र पक्षांनाही आता सावध रहावे लागेल. कारण भाजपचे पारडे जड झाले आहे.

- Advertisement -

मागील विधानसभेत एकनाथ शिंदे किंवा अजित पवार या दोन्ही गटांची ‘गरज’ भाजपला किमान होती, मात्र आता मिळालेल्या कमाल यशामुळे ही फारशी उरलेली नाही. भाजपच्या मोठ्या संख्याबळामुळे विरोधकांचे प्रादेशिक राजकारण संपवले आहेच, सोबतच मागील अडीच तीन वर्षात सोबत असलेल्या मित्रपक्षांनाही धडकी भरवली आहे. आता तडजोडीची भाजपला गरज उरलेली नाही. भाजपच्या विजयासाठी मैदानात उतरलेली पक्षांतर्गत तसेच पक्षबाह्य यंत्रणा, केंद्राचे पाठबळ आणि आर्थिक रणनीतीच्या मार्गाने या विजयाचा मार्ग भाजपसाठी सुकर केला. मावळत्या विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो प्रभाव होता तोही आता कमी झाला आहे.

भाजपच्या या विजयाच्या त्सुनामीमुळे प्रादेशिक विरोधकांचा धुराळा उडाला आहे. या प्रादेशिक राजकारणातूनच बंडखोरीच्या मार्गाने जन्म घेतलेल्या शिंदेंच्या शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादीचाही पुढचा मार्ग राजकीयदृष्ठ्या अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. मागील विधानसभेच्या तुलनेत या दोन्ही पक्षांच्या जागा निश्चितच वाढल्या आहेत. विजयाच्या या कौतुक सोहळ्याच्या जल्लोषात भाजपची ताकद मात्र तिपटीने वाढली असल्याचे या दोन्ही ‘बंडखोर’ मित्रांना लक्षात घ्यावे लागेल. त्यांनी केलेली बंडखोरी ही सत्तेसाठी आणि तपास यंत्रणांच्या ससेमिर्‍यापासून बचावासाठी होती, हे सर्वश्रुत आहे. सुगरणीने संपूर्ण स्वयंपाकघर ताब्यात घेतल्यावर मित्रांना सत्तेत वाढलेले पान हे त्यांच्या तोंडाला पाने पुसणारे किंवा खरंच त्यांचे पोट भरणारे आहे का? ही चिंता या मित्रांना पुढील पाच वर्षे वाहावी लागणार आहे. पान जरी वाढलेले असले तरी त्यातील पदार्थ हे स्वयंपाकघर ताब्यात घेतलेल्या गृहिणीच्या बरहुकूमच वाढले जाणार आहेत, हे या निमित्ताने स्पष्ट व्हावे.

- Advertisement -

मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे किंवा अजित पवार जरी आले तरी त्यांच्यावर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचा आणि पर्यायाने केंद्रातील मोदी, शहांचा अंकुश कायम राहील हे स्पष्ट आहे. शिंदे आणि पवार गटाचे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदी भाजपचे देवेंद्र फडणवीस असे प्राथमिक सूत्र समोर येत आहे. भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असाच आग्रह आहे. एकहाती सत्ता मिळवणार्‍यांसाठी एकाधिकारशाही हा बरेचदा अधिकारच असतो, त्यामुळे उगवत्या विधानसभेत संबंधित उपमुख्यमंत्रीपदे ही केवळ सत्तेतील ‘आश्रीत’ म्हणून रबरी स्टॅम्प आणि सहीपुरती मर्यादित होण्याची शक्यता आहे.

राहत इंदौरी साहेबांचा एक शेर आहे…‘लगेली आग तो कई घर आएंगे जद में…यहाँ एक हमारा मकान थोडी है’ विरोधकांकडे अर्थात उरल्यासुरल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे आता गमावण्यासारखे काही नाही, त्यांच्या ताब्यात असलेले उर्वरित अनुक्रमे २० आणि १० या आकड्यांचे राजकीय मूल्य तसेही काहीच नाही. हे आकडे सोबत राहतील किंवा सत्तेत सहभागी होतील, याची चिंताही दोघांना गरजेची नाही. जमिनीवर कोसळलेल्या पक्ष्याला केवळ अवकाशात उडण्यासाठी पंखात बळ यावे म्हणूनच झेप घ्यावी लागते, शिकार हा त्याचा आता उद्देश नसतो, स्वत: शिकार झालेल्यांमध्ये इतरांची शिकार करण्याचे बळ नसते.

विधानसभेच्या निकालानंतर प्रादेशिक माशांना गिळंकृत केलेल्या महाकाय शार्कची भीती त्याच्या आसर्‍याला राहाणार्‍या इतर छोट्या माशांमध्ये आलेली आहे. महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकीय पटावर देवेंद्र फडणवीस हाच वजीर प्रभावी आहे आणि या वजिराच्या ताब्यातच सत्तेचा संपूर्ण पट महाराष्ट्राच्या जनतेने दिला आहे. आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कुठले स्थान मिळणार हे सर्वस्वी त्याच्या हातात आहे. महाराष्ट्रात शतप्रतिशत भाजप हे त्या पक्षाच्या नेत्यांचे फार पूर्वीपासूनचे स्वप्न आहे. त्या लक्ष्याच्या ते अगदी जवळ पोहोचले आहेत. मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे असेल तर ते सहज गाठता येईल, त्यामुळे त्यांचा तसाच प्रयत्न राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -