HomeसंपादकीयओपेडSaif Ali Khan Son : तैमूर, जहांगीर या नावांचा राग का येतो?

Saif Ali Khan Son : तैमूर, जहांगीर या नावांचा राग का येतो?

Subscribe

तैमूर, जहांगीर अशी नावे घेतली की भारतीयांच्या अंगावर भीतीचा काटा उभा राहतो. कारण या नावांच्या माणसांनी तशी दुष्कृत्ये केलेली होती. त्याची इतिहासात नोंद आहे. भारतावर आक्रमणे करून अशा नावांच्या मुस्लीम आक्रमकांनी लाखो लोकांच्या अमानुष कत्तली केल्या, स्त्रीयांची अब्रू लुटली, त्यांना पळवून नेले, प्रचंड संपत्तीची लूट केली. जनमानसावर त्यांनी अशा भयंकर जखमा केल्याचा इतिहास असताना कुणी आपल्या मुलांना त्यांची नावे देतो तेव्हा त्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या होतात.

आपल्या मुलांची नावे कुणी काय ठेवावीत, हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. स्वतंत्र भारतात तर त्यावर बंदी असण्याचे काही कारणच नाही. कारण भारत हे काही पाकिस्तान किंवा बांगलादेशसारखे मुस्लीम राष्ट्र म्हणून घोषित केलेले नाही. उलट भारतामध्ये राहणार्‍या सगळ्यांना भारतीय राज्यघटनेने समान हक्क दिले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या विवाहानंतर त्यांनी आपल्या पहिल्या मुलाचे नाव तैमूर असे ठेवले, तर दुसर्‍या मुलाचे नाव जहांगीर असे ठेवले.

तैमूर या नावाचा अर्थ लोखंडासारखा ठणक आणि जहांगीर या नावाचा अर्थ जगावर राज्य करणारा. या नावांचा अर्थ पाहिला तर तसं काही गैर वाटत नाही. कारण यातून काही चुकीचा अर्थ व्यक्त होत नाही, पण प्रत्येक देशाला एक इतिहास असतो आणि आपण कितीही पुढचा प्रवास केला तरी त्या देशातील लोकांना आपला इतिहास विसरता येत नाही. कारण वर्तमान हा इतिहासाचाच विस्तारित भाग असतो.

जसे आता आपण वर्तमानात आहोत, पण आपल्याला आपल्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांचे अस्तित्व नाकारता येणार नाही. कारण ते आता आपल्यात नसतील आणि आपल्याला दिसत नसतील तरी त्यांचे अस्तित्व होते म्हणूनच आज आपण आहोत हे आपल्याला मान्य करावे लागेल. त्यामुळे त्यांना जी काही दु:खं भोगावी लागली, त्याच्या वेदनांचे आपल्याला विस्मरण होत नाही. कारण ते आपले पूर्वज असतात. त्यांचे आपल्याशी नाते असते.

तसेच संपूर्ण भारतीय समाज म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तैमूर आणि जहांगीर या नावांमागचा इतिहास आपण पाहिला तर आपल्याला धक्का बसतो. ही नावे आठवली की आपल्याला त्यांच्याविषयी आपण शिकलेला इतिहास आठवतो. भारतावर कुणी कुणी आक्रमणे केली, इथल्या लोकांवर त्यांनी किती क्रूरपणे अत्याचार केले, इथली अमाप संपत्ती कशी लुटून नेली, त्यांनी इथे कसे जबरदस्तीने धर्मांतर केले, त्यांनी इथल्या लोकांची जी श्रद्धास्थाने होती ज्यामुळे इथल्या धर्मिक भावना टिकून होत्या, संकटकाळी तेच आपले तारक आहेत असा विश्वास होता, त्यांच्यावरच या आक्रमकांनी आघात केला.

त्यांच्या मूर्तीं फोडल्या. असे अनेक आघात इथल्या लोकांच्या मनावर करण्यात आले. तो आघातांचा इतिहास कुठल्याही समाजाला विसरता येत नाही. त्यामुळे जेव्हा अशा आक्रमकांची नावे पुढे जेव्हा कधी वर्तमानात ऐकू येतात तेव्हा समाजाला तो इतिहास आठवतो, त्या नावाच्या माणसांनी केलेले अन्याय अत्याचार, बलात्कार सगळेच आठवते आणि मनात चीड निर्माण होते.

वर्तमानात आपल्या मुलांची अशी नावे ठेवल्याने ती मुले पुढे त्यांच्या नावाला जागून तसेच अन्याय अत्याचार करणारे बनतील अशातला भाग नाही, पण बहुसंख्य समाजावर त्या नावांचा जो प्रभाव आहे तो त्याला विसरता येत नाही. ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी भारत हा अखंड होता. पुढे ब्रिटिश राजवटीविरोधात जेव्हा दीर्घकाळ लढा देण्यात आला तेव्हा भारतातील सर्वधर्मीय त्यात सहभागी झाले होते. त्यात मुस्लीमदेखील होते. भारतावर ज्या मुस्लीम आक्रमकांनी आक्रमणे केली, त्यातील काही जण इथल्या लाखो लोकांच्या कत्तली उडवून प्रचंड लूट घेऊन निघून गेले.

त्यात तैमूर, गझनीचा महमद, महमद घोरी असे होते, तर अकबरासारखे काही इथेच येऊन राहिले, ते परत गेले नाहीत. त्यातूनच मग पुढे इथे मुस्लीम धर्माचा प्रसार झाला. इथल्या हिंदू शासकांशी त्या मुस्लीम शासकांच्या लढाया झाल्या, पण मुस्लीम शासकांनी या देशावर राज्य केलेले असल्यामुळे आपणही इथले राज्यकर्ते आहोत ही भावना त्यांच्या अनुयायी मुस्लिमांमध्ये वाढू लागली.

त्यामुळे एका बाजूला ब्रिटिशांविरोधात काँग्रेसच्या माध्यमातून लढा सुरू असला तरी इथलेच काही मुस्लीम नेते मुस्लिमांसाठी वेगळ्या राष्ट्राच्या निर्मितीची तयारी करीत होते. सय्यद अहमद खान हे त्यापैकी एक प्रमुख नेते होते. पुढे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मुस्लिमांसाठी वेगळ्या देशाची मागणी प्रत्यक्षात उतरवण्यात आली. आपण सगळे मिळून मिसळून राहू, अशा काँग्रेस नेत्यांनी केलेल्या विनवण्या मुस्लीम लीगच्या नेत्यांनी लाथाडून दिल्या. महमदअली जीना हे वेगळ्या पाकिस्तानची मागणी करणारे मुख्य नेते होते.

सुरुवातीला काँग्रेसकडून वेगळ्या पाकिस्तानची मागणी नाकारण्यात आली, तेव्हा पाकिस्तानवादी नेत्यांनी शहरांमधील मुस्लीम वस्त्यांसोबत गावागावात आपली माणसे पाठवली आणि वेगळ्या पाकिस्तानच्या मागणीसाठी प्रचंड दंगली पेटवल्या आणि अत्याचाराचे अघोरी सत्र सुरू केले. त्यावेळी भारतासारख्या हिंदूबहुल देशात मुस्लीम हे अल्पसंख्य होते. त्यामुळे संख्याबळाच्या जोरावर त्यांची मागणी सहज फेटाळता आली असती, पण ते अल्पसंख्य असले तरी त्यांची आक्रमकता इतकी भयंकर होती की त्या कत्तली आणि दंगे थांबवण्यासाठी काँग्रेसला फाळणीला मान्यता द्यावी लागली. बहुसंख्यकांचा अल्पसंख्याकांपुढे पराभव झाला. जगात असे दुसरे उदाहरण सापडणार नाही.

अल्पसंख्य असलेल्या मुस्लिमांकडे प्रेरणा होती ती या देशावर आम्ही एकेकाळी राज्य केले आहे, आमचे पूर्वज राज्यकर्ते होते, ते पूर्वज कोण तर या देशावर आक्रमण करणारे मुस्लीम आक्रमक. त्यामुळे हिंदू आणि मुस्लीम ही दोन राष्ट्रे आहेत अशीच भावना मुस्लीम नेत्यांनी निर्माण केली. भारताची फाळणी करून महमदअली जिनांनी पाकिस्तानची निर्मिती केली. गेली ७५ वर्षे त्यांनी भारताचा अखंड द्वेष केला.

चार युद्धे केली. जगभरातून जी आर्थिक आणि युद्धसामुग्री मिळाली ती भारताविरुद्ध वापरली. त्यांनी जी क्षेपणास्त्रे तयार केली, त्यांना भारतावर अन्याय अत्याचार आणि लूट करणार्‍या महमद गझनी, महमद घोरी यांची नावे दिली. त्यातून त्यांना भारतीयांच्या मनात दहशत निर्माण करायची आहे की, पाहा ज्या आक्रमकांनी तुमची दाणादाण उडवली होती, त्यांचीच ही क्षेपणास्त्रे प्रतिनिधी आहेत.

भारताची फाळणी झाल्यानंतर अनेक मुस्लीम लोक आपले नशीब काढण्यासाठी भारतात आले किंवा बरेच पाकिस्तानात न जाता इथेच राहिले. त्यांनी पुढे आपली मुस्लीम नावे बदलून हिंदू नावे घेतली. हिंदी सिनेसृष्टीतील ही काही उदाहरणे आहेत. महजाबीन बानोची मीना कुमारी झाली, महमद युसूफ खान दिलीप कुमार झाले, मुमताज जेहान देहलवीची मधुबाला झाली, शाह अब्बास खानचे संजय खान झाले, सय्यद जेफरीचे जगदीप झाले, झकारिया खानचे जयंत झाले, हमीद अली खानचे अजित झाले. हे केवळ सिनेसृष्टीत नाही तर विविध क्षेत्रात दिसून येईल.

बहुसंख्य हिंदू समाजाने आपला स्वीकार करावा म्हणून या मुस्लिमांना आपली नावे बदलून ती हिंदू करावी लागली. याचा अर्थ आपण जर का मुस्लीम नावे धारण करून राहिलो तर त्यामुळे इथल्या बहुसंख्य हिंदू लोकांच्या भावनांना धक्का बसतो. त्यांना मुस्लीम आक्रमकांचा इतिहास आठवतो. त्यामुळे आपल्या व्यवसायावर परिणाम होईल. आपल्याला नशीब काढता येणार नाही. आपल्याला हिंदू नावे स्वीकारण्यावाचून गत्यंतर नाही हे त्यांना माहीत होते. त्यांनी सोयीसाठी हिंदू नावे स्वीकारली तरी आतमध्ये ते मुस्लीमच होते.

त्याची लोकांनाही कल्पना होती, पण तरीही इथल्या लोकांनी त्यांना सापत्न वागणूक दिली नाही. त्यांना सुपरस्टार म्हणून डोक्यावर घेतले. त्यांचे चाहते बनले, पण जेव्हा यांच्यापैकीच काही जण इथल्या बहुसंख्य समाजावर ज्यांनी अमानुष अत्याचार केले, बायकांची अब्रू लुटली, बायका पळवून नेल्या, प्रेतांचे इमले रचले, अशा मुस्लीम आक्रमकांची नावे आपल्या मुलांना देत असतील तर याला काय म्हणावे. म्हणजे ज्यांनी तुम्हाला जखमा दिल्या, त्यांची नावे आमच्या मुलांना देऊन त्यावर आम्ही मीठ चोळू अशातलाच हा प्रकार झाला. ही कृतघ्नता नाही का?