घरसंपादकीयअग्रलेखमराठी दिनाची दणक्यात औपचारिकता!

मराठी दिनाची दणक्यात औपचारिकता!

Subscribe

आज मराठी राजभाषा दिन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात इतकेच नव्हे जगभरात जिथे जिथे मराठी भाषिक राहतात तिथे साजरा केला जाईल. यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातील. या दिवशी आपण मराठी असल्याचे स्फुरण अनेक मराठी भाषिकांच्या अंगी येते.

आज मराठी राजभाषा दिन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात इतकेच नव्हे जगभरात जिथे जिथे मराठी भाषिक राहतात तिथे साजरा केला जाईल. यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातील. या दिवशी आपण मराठी असल्याचे स्फुरण अनेक मराठी भाषिकांच्या अंगी येते. अर्थात हा दिवस नेमका कशासाठी साजरा केला जातो हे अनेक मराठी जणांना माहीत नसते ही गोष्ट वेगळी, पण आता विविध प्रकारच्या समाजमाध्यमांमध्ये भरघोस वाढ झालेली असल्यामुळे मराठी राजभाषा दिनाचे संदेश सगळीकडे वेगाने पसरवले जातात. हे संदेश एकमेकांना पाठवण्यात आपण कसे आघाडीवर आहोत याची जणू स्पर्धा लागते. ती स्पर्धा सकाळी सुरू होते आणि सायंकाळी सूर्य मावळला की संपते. या दिवसभरात आपण मराठी भाषिक असल्याचे आणि आपली भाषा जगवणे आणि टिकवणे कसे महत्त्वाचे आहे हे एकमेकांना मोठ्या पोटतिडकीने समजावून सांगण्यात येते.

या मराठी राजभाषा दिनाच्या अगोदर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो. त्या काळातही विविध उपक्रम राबविले जातात. एकूणच काय तर हा दिवस साजरा करण्याचे स्वरूप पाहिले तर एक दिसून येते, ते म्हणजे मराठी राजभाषा दिनाची औपचारिकता दणक्यात पार पाडण्यात येतेे. एक मराठी माणूस दुसर्‍याला शुभेच्छा देऊन आपली औपचारिकता पार पाडतो. सध्याच्या स्थितीतील मराठी भाषा दिनाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी दरवर्षी एकाच खड्ड्यात मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण करण्याचे उदाहरण घेता येईल. अनेक मान्यवर मंडळी वृक्षारोपण दिनी एका ठिकाणी जमतात. मानवी जीवनातील वृक्षांचे महत्त्व काय आहे यावर आपले मोठमोठे विचार मांडतात. त्या ठिकाणी असलेल्या एका खड्ड्यामध्ये रोप लावतात. त्याच्या मुळावर स्वहस्ते माती आणि पाणी घालतात. उपस्थित मंडळी टाळ्यांचा कडकडाट करतात. गोडाचे वाटप होते. सगळी मंडळी तोंड गोड करून तिथून निघून जातात. त्यानंतर त्या खड्ड्यामध्ये लावलेल्या रोपाकडे वर्षभरानंतर येणार्‍या वृक्षारोपण दिनापर्यंत कुणी पाहत नाही.

- Advertisement -

जेव्हा पुढील वृक्षारोपण दिनी हीच मंडळी पुन्हा येतात, तेव्हा तिथले झाड तर नष्ट झालेले असतेच, पण खड्डादेखील बुजलेला असतो. असे का होते, कारण केवळ रोप लावून चालत नाही, त्याची सातत्याने जोपासना करावी लागते. त्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी सभोवताली पोषक असे वातावरण तयार करावे लागते. आज मराठी भाषेची अशीच अवस्था होत चाललेली आहे. मराठी असे आमची मायबोली, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, अशी अनेक गीते आजच्या दिनी कंठरवाने गायली जातील. काही गाणी नव्याने बनवण्यात येतील, पण हा सगळाच सचित्र दिसणारा वरवरचा आभास झाला. कारण अशी गाणी बनविण्यामागेही खर्‍या आपलेपणापेक्षा मार्केटिंग आणि व्यावसायिकीरणाचा जास्त भाग असल्याचे दिसून येते. कारण दुसर्‍यांना मराठी भाषा बोलण्याचे आवाहन करणारे लोक आपण स्वत: किती मराठी बोलतात आणि आपल्या मुलांशी ते मराठी बोलतात का, हा प्रश्न आहे. उलट आपला मुलगा किंवा मुलगी इंग्रजी माध्यमात शिकतात. त्यामुळे त्यांना मराठी बोलता येत नाही. त्यात पुन्हा इंग्रजी शाळेत चुकून मराठी विषय असलाच तर त्याला लोअर मराठी आहे. त्याला हायर मराठी समजत नाही, अशी सारवासारव केली जाते. थोडक्यात काय तर एका बाजूला मराठी माणूस विविध माध्यमातून आपल्या भाषाप्रेमाचा दिखावा करत असतो, तर दुसर्‍या बाजूला आपली मुले मराठीपासून कशी दूर राहतील यासाठी आटापिटा करत असतो. त्याला जास्त खर्च पडला तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवत असतो. मराठी शाळांमध्ये स्वस्त शिक्षण उपलब्ध असले तरी तो आपल्या मुलांना तिकडे पाठवत नाही. मराठीला स्कोप नाही. त्यामुळे आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालतो, असे बर्‍याच मराठी पालकांचे म्हणणे असते.

आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातले तर ती अधिक हुशार होतील, असा या पालकांचा समज असतो. मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिल्यास विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजतो, असे जगभरातील भाषातज्ज्ञ सांगत असले तरी आज बहुतांश पालक ते मानायला तयार नाहीत. आपल्याला फाडफाड इंग्रजी बोलता आले असते तर आपण यशाच्या शिड्या धडाधड चढलो असतो. अधिक मोठ्या संधी मिळवल्या असत्या, असा बहुसंख्य मराठी पालकांचा ठाम समज आहे. त्यात पुन्हा जे उच्चवर्णीय आणि उच्चशिक्षित मराठी भाषिक आहेत, त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालून या देशात तुला काही भवितव्य नाही, तू काहीही करून विदेशात जा, तिथे तुला नशीब काढता येईल, असे लहानपणापासून डोक्यात भरवलेले असल्यामुळे ती मुले विदेशात जातात. तिकडे स्थायिक होतात. त्यामुळे या उच्चवर्णीय उच्चशिक्षितांचे पाहून समाजातील इतर लोक तेच अनुकरण करतात. मातृभाषा असो नाही तर मातृभूमी असो सगळा सोयीचा मामला असतो. भावनेपेक्षा व्यवहार श्रेष्ठ ठरतो. त्यामुळे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ज्या साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनी आपण मराठी राजभाषा दिन साजरा करतो, त्यांच्या नटसम्राट या नाटकात ते म्हणतात, आभाळ पाठीवर घेऊन जाणार्‍या हत्तींनासुद्धा विचारून पाहा, कुणीही कुणाचे नसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -