HomeसंपादकीयओपेडAggression and Crime : मानवतेवरील ओढवलेले मोठे संकट!

Aggression and Crime : मानवतेवरील ओढवलेले मोठे संकट!

Subscribe

आपण मोठे होण्यासाठी इतरांचे हिसकावून घेणे, गुंडगिरी करणे, खंडण्या गोळा करणे, इतरांना धमकावणे, प्रसंगी त्यांची हत्या करणे हेच करावे लागते असे वाटणार्‍या तरुणाईच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. अशा बौद्धिक दिवाळखोरीने ग्रस्त झालेल्या माणसांचा या समाज जीवनातील वावर तमाम मानवतेवर चालून आलेले संकट आहे. हे काही आजच घडत आहे असे नाही, हे पूर्वीपासून घडत आलेले आहे, पण हे मान्य करावे लागेल की यातील क्रौर्य मात्र दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

– अमोल पाटील

‘प्रेमाने जग जिंकता येते’ हे आपल्या वडीलधार्‍या मंडळींनी वेळोवेळी आपल्याला ऐकवलेले वाक्य. वडीलधारी मंडळी जेव्हा अशी वाक्यं जपतात, जगतात आणि पुढील पिढ्यांनाही ऐकवतात तेव्हा त्यामागे त्यांनी या पुढील पिढ्यांचे हित चिंतलेले असते. ‘जो जीभ जिंकतो तो जग जिंकतो’ हा आम्ही शिकलेल्या शाळेच्या भिंतीवरील सुविचार आजही जसाचा तसा आठवतो. त्यावेळी जाता येता या सुविचाराचे वाचन आम्ही मुले करीत असू.

तेव्हा त्या वयातील अनुभव कक्षा मर्यादित असल्यामुळे याचा गर्भितार्थ तितकासा समजला नव्हता. जसजसे आयुष्यात अनेकानेक अनुभव येत गेले तसतसे या सुविचाराचे महत्त्व पटत गेले. हा सुविचार जगातील निम्म्या जरी लोकांना पटला व त्यावर त्यांनी अंमल केला तर जगातील सर्व वादविवाद क्षणार्धात कसलीही किंमत न मोजता मिटतील. यात दंगे, खून, मारामार्‍या, युद्ध आणि महायुद्धाचाही समावेश करायला हरकत नाही.

अगदी इतिहासकालीन मोठमोठी युद्धे महायुद्धांचा, त्यांच्या कारणांचा अभ्यास केला तर सुज्ञांच्या लक्षात येईल की कुणीतरी कुणाचा तरी वाणी अगर व्यवहारातून अपमान केलेला असतो वा समोरच्यापेक्षा स्वत:चे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आपल्या अहंकाराला गोंजारून समोरच्या व्यक्तीच्या अहंकाराला ठेच पोहचवलेली असते. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी व स्वत:च्या अहंकाराला जपण्यासाठी मग युद्धाला आरंभ होत असे.

मग अशा युद्धांमुळे त्या दोन्ही गटांचे अतोनात नुकसान होण्यापासून दुसरा पर्याय नसतो. अहंकाराला बळी गेलेल्या अशा व्यक्तींमुळेच अगदी इतिहासकाळापासून आज वर्तमानापर्यंत माणुसकीला धोका निर्माण होत आला आहे. ज्या ज्या वेळी अशी अहंकारी मंडळी उन्मत्त झाली, मानवतेवर चाल करून आली त्या त्या वेळी येथील महापुरुषांनी त्याचा बिमोड करून मानवतेची पुनर्स्थापना करीत सामान्यांना अभय मिळवून देण्याचे महान कार्य केलेले आपणास पाहायला मिळते.

भांडण, तंटे, युद्ध, लढाया यांसारख्या बाबी थांबवून या जगात परस्पर प्रेम व बंधुभावाचे नंदनवन फुलवणे हे सहज शक्य आहे, पंरतु जगात शांतता प्रस्थापित करू शकणारा हा सहज मार्ग लोकांनी अवलंबायचा नाही असेच प्रथमदर्शनी ठरवल्याचे लक्षात येते. माणूस प्राणी इतका क्रूर यापूर्वी कधीच नसेल.

क्षणभर तरी असा मनात विचार यावा अशा घटना आजकाल आपल्या आजूबाजूला घडत आहेत. अत्यंत निर्घृण स्वरूपाचे खून, बलात्कार, लुटमार आदी दुष्कृत्यांच्या अलीकडील घटना आणि दिवस दरदिवस त्यांचे वाढते प्रमाण पाहिले तर आपण मानव समाज हा बुद्धिमान प्राणी म्हणून मिरवून घेण्याला खरंच पात्र आहोत का? याबद्दल फेरविचार करणे या समाजाचा एक घटक म्हणून गरजेचे वाटते.

परमेश्वराकडून आपले हे जीवन सुंदर बनवण्यासाठी अनेक देणग्या आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. आपल्याजवळील मन हेच विधात्याचे स्वरूप आहे. बुद्धीच्या सहाय्याने सारासार विचार करून सुविचार तेवढे जोपासून मनाला हवं तसं सजवता-फुलवता येणे शक्य आहे, असे थोरांकडून शिकतच आपण मोठे झालो आहोत. इतरांबद्दलचा प्रेमभाव व बंधुभाव मनोमन एकदा का जोपासता, फुलवता आला की जगणे स्वत:साठी व इतरांसाठीही आनंददायी होते.

सृजनाला पालवी फुटून बुद्धी नवनवे आविष्कार घडवते. प्रत्येक क्षण नित्यनूतन सुखद अनुभवांनी ओतप्रोत भरलेला अनुभवास येऊ लागतो. जाणारा प्रत्येक क्षण काहीतरी नवं शिकवून गेलेला तर येणारा प्रत्येक क्षण काहीतरी नवं शिकवणारा ठरतो. आयुष्याच्या या वळणावर मन परमोच्च आनंद उपभोगते आणि विशेष म्हणजे ते कुणलाही नख न लावता मिळवलेले असते. परमेश्वराकडून मिळालेल्या बुद्धीचा यथोचित उपयोग करून हे माणसाला मिळवता येते.

मोठे होणे म्हणजे इतरांचे हिसकावून घेणे, गुंडगिरी करणे, खंडण्या गोळा करणे, इतरांना धमकावणे, प्रसंगी त्यांची हत्या करणे हेच करावे लागते असे वाटणार्‍या तरुणाईच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. अशा बौद्धिक दिवाळखोरीने ग्रस्त झालेल्या माणसांचा या समाज जीवनातील वावर तमाम मानवतेवर चालून आलेले संकट आहे हे मान्य करावे लागेल. हे काही आजच घडत आहे असे नाही, हे पूर्वीपासून घडत आलेले आहे. हे मान्य करावे लागेल की यातील क्रौर्य मात्र दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

पूर्वीपासूनच अशा समाजविघातक प्रकारांपासून समाजाला वाचवण्यासाठी व समाजाच्या उद्धारासाठी साधूसंतांनी आपल्या लेखनी आणि वाणीतून समाजाचे प्रबोधन केले. खर्‍याखोट्याची, न्याय-अन्यायाची जाण या समाजाला करून दिली. हा समाज सन्मार्गावर चालत राहील यासाठी थोर साधना करून सुंदर विचार दिले. आजही त्या विचारांवर चालणारा त्याचे चिंतन करणारा मनुष्य समाजाचे भूषणच ठरत असतो.

क्षणिक प्रसिद्धीच्या मागे लागलेले व केवळ वाईट मार्गाचा अवलंब केल्यानंतरच येथील सर्व सुखे मिळवता येतात अशी धारणा करून घेतलेले गुंड प्रवृत्तीचे लोक अशा सुंदर विचारांपासून दूर जाऊन समाजविघातक कृत्ये करू लागतात. अशाच दुष्ट लोकांमुळे समाजात अस्थिरता निर्माण होते. निष्पाप लोकांवर अन्याय होतो. प्रसिद्धी व चंगळवादाच्या मोहात अडकलेली ही मंडळी भ्रष्ट मार्गाचा सर्रास वापर करीत सुटते. अंतिमत: स्वत:च स्वतःच्या कुकर्मांनी स्वत:भोवती विणलेल्या जाळ्यात अडकून पश्चातापास पात्र होऊन स्वत:चा विनाश अशी मंडळी ओढवून घेते.

मूलत: कुठलीही व्यक्ती वाईट नसते. त्याने स्वअंगी बाळगलेल्या विचारांतून त्याचा दृष्टिकोन तयार होतो. व्यक्ती चांगली किंवा वाईट हा तिचा दृष्टिकोनच ठरवत असतो. एकंदरीत कुसंगामुळे जर वाईट विचारांची पेरणी मन:पटलावर झाली तर त्यातून अनेक पूर्वग्रहदूषित विचार उगवतात. यामुळे जगाबद्दल नकारात्मक दृष्टिकोन तयार होऊन माणूस स्वत:च्या स्वकेंद्रित व समाजविघातक अहंकाराला मिरवू लागतो. हाच अहंकार त्याला गर्विष्ठपणाचा माज मिळवून देतो.

गरीब असहाय्य निष्पाप लोक त्याच्या या अहंकाराचा बळी ठरत गेल्यानंतर तो अद्वातद्वा फुगू लागतो. त्याची परिणती त्याची अशी समाजविघातक कृत्ये वाढवत नेण्याकडे होऊन तो स्वत:च स्वत:च्या विनाशास कारणीभूत ठरतो. जेव्हा पश्चातापाची वेळ येते तेव्हा कदाचित खूप उशीर झालेला असतो. कधी कधी परतीचे सर्व मार्गही बंद झालेले असतात.

यासाठी मन:पटलावर विचारांची पेरणी करताना आपण किती सावध असले पाहिजे हे सिद्ध होते. इंटरनेटच्या या काळामध्ये सर्वात जवळचा सोबती म्हणून सगळे जण मोबाईलकडे पाहतात. तो मोबाईल व त्यातील समाजमाध्यमे आपणास काय शिकवतात, काय दाखवतात, आपल्या मनावर काय पेरतात त्यापेक्षा त्यांकडून आपण काय शिकायचे, काय पाहायचे व त्याद्वारे आपण काय घ्यायचे हे कळण्याइतपत शहाणपण आज सर्वांकडे असले पाहिजे.

समाजातील सुज्ञ वर्गाकडून यथाशक्ती आजच्या पिढीला असे शहाणपण देता आले तर फार मोठे कार्य होईल. हा निव्वळ समाज जागृतीचा विषय आहे. समाजाचा विशेषत: तरुण पिढीचा बुद्ध्यांक वाढवण्यासाठी या पिढीला चंगळवादापासून परावृत्त करून त्यांना विचारप्रवण करण्याची आज गरज आहे. साधूसंतांची, महापुरुषांची चरित्रे, त्यांचे विचार, तत्त्वज्ञान यांचा आज नियमितपणे जागर झाला पाहिजे.

जाणकार सृजनांनी ‘लोक शिक्षक’ ही भूमिका घेऊन येथील उगवत्या पिढीला क्षणोक्षणी घडवण्याची ही वेळ आहे. तेव्हा निश्चितच ही उमलती फुले सुविचारांचा सुगंध सर्वत्र पसरवतील हे खरे. सुविचारांचा जागर झाल्यानंतर इतरांप्रतिची वाढलेली क्रूरता संपून जाऊन त्याची जागा इतरांप्रतिचा स्नेहभाव व प्रेमभाव निश्चितच घेईल. जगण्याचे नवे सुंदर मानवतावादी आयाम सगळ्यांना कळू लागतील.

आपल्याइतकाच सर्वांना जगण्याचा अधिकार आहे हे समजल्यामुळे कुणी कुणाचे हिसकावून घेण्याचा व कुणाचा बळी घेण्याचा विचार करणार नाही. सुविचारांमुळे कल्पित अहंकार गळून पडल्यामुळे इतरांपेक्षा स्वत:चे आभासी श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या फंदात ही तरुणाई पडणार नाही. ती सृजनातून नवनिर्मितीद्वारे हे जग अधिक सुखी कसे होईल यासाठी प्रयत्न करेल. हाच पृथ्वीवर अवतरलेला खराखुरा स्वर्ग असेल.

कुसंगामुळे कुविचारांतून
पोसता दृष्टिकोन अहंकारी
आनंद सारा नष्ट होऊनी
पडतो पश्चाताप पदरी