Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeसंपादकीयअग्रलेखYogesh Kadam Statement : थोडी संवेदनशीलता बाळगा

Yogesh Kadam Statement : थोडी संवेदनशीलता बाळगा

Subscribe

पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारातील बलात्काराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून फरार झालेला आरोपी दत्तात्रय गाडे याला बेड्या ठोकण्यात पुणे पोलिसांना तीन दिवसांनी यश आले आहे. दत्तात्रय गाडेने कायम झोपेत असलेल्या एसटी आगारातील सुरक्षा व्यवस्थेचा गैरफायदा उचलत पीडितेवर शिवनेरी बसमध्ये कूकर्म केले होते.

सावज हेरण्यासाठी गाडे दररोज स्वारगेट बस आगाराच्या आवारात फिरायचा असे कळते. पीडितेवर बलात्कार करून तो फरार झाला होता. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद होताच पोलिसांनी १३ पथके गाडेच्या मागावर पाठवली होती. अखेर कधी घरात, कधी शेतात, कधी डॉग स्क्वॉडच्या, तर कधी ड्रोनच्या मदतीने शोध घेतल्यानंतर शिरूरच्या गुनाट गावातील एका शेतात लपून बसलेल्या गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतले.

दुसरीकडे या घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या एसटी प्रशासनाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशावरून २३ सुरक्षा रक्षकांना तात्काळ निलंबित केले. आता या सुरक्षा रक्षकांच्या जागी नवीन सुरक्षा रक्षकांची नेमणूक होईल, एसटी बसमध्ये जीपीएस आणि आगारांमध्ये सीसीटीव्ही लावले जातील. पुढचे काही दिवस राज्यभरातील एसटी आगारातील दुरवस्थेच्या बातम्या प्रसिद्ध होतील आणि हळूहळू करत प्रशासकीय व्यवस्था पुन्हा एकदा निद्राधीन होईल.

आज स्वारगेट प्रकरणामुळे महाराष्ट्रात महिला सुरक्षेच्या मुद्यावरून चर्चा झडत आहे, काल याच चर्चेच्या केंद्रस्थानी पुण्याच्या भोपदेव घाटात एका तरुणीवर झालेल्या बलात्काराचा विषय होता, तर त्याआधी बदलापूरमध्ये दोन लहानग्या चिमुरड्यांवर झालेला लैंगिक अत्याचार राज्यभरात गाजत होता. कालच नालासोपार्‍यात एका नराधम बापाने पोटच्या ४ मुलींवर वारंवार बलात्कार केल्याचे प्रकरण पुढे आले. हे कुटुंब आधी कणकवलीत राहायचे. कुख्यात गुंड असलेला हा बाप मागील काही वर्षांपासून या मुलींवर बलात्कार करत होता.

त्यातील मोठ्या मुलीला अनेकदा गर्भपातही करावा लागला होता. परंतु बापाच्या भीतीमुळे या मुलींनी आपले तोंड उघडले नाही. नालासोपार्‍यात एका नातेवाईकाकडे राहायला आल्यावर मोठ्या धाडसाने या मुलींनी पोलिसांत तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी सिंधुदुर्गातून आरोपी बापाला अटक केली. मोठ्या मुलीने आधीच पोलीस ठाणे गाठले असते, तर कदाचित तिच्या लहान बहिणी बापाच्या अत्याचाराच्या बळी ठरल्या नसत्या, असे अकलेचे तारे आता काहीजण तोडू लागले आहेत.

अगदी त्याचप्रमाणे भोपदेव घाटात तरुणी मित्रासोबत एकटी फिरायला कशाला गेली होती? असे विषय व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीवर चघळले जात होते. स्वारगेट प्रकरणातही बलात्कार होत असताना ती तरुणी ओरडली का नाही, असाच प्रश्न काही अक्कलशून्य महाभागांकडून उपस्थित केला जात आहे. ती तरुणी एवढ्या भल्यापहाटे गावी जाण्यास निघालीच कशी? अनोळखी माणसाबरोबर अंधार्‍या बसमध्ये गेलीच कशाला?

तिने आरडाओरडा अर्थात प्रतिकार न केल्यामुळेच आगारातील सुरक्षा रक्षकांना ही गोष्ट कळू शकली नाही, असे निरर्थक प्रश्न उपस्थित केले जात आहे. दुर्दैवाने असे प्रश्न उपस्थित करणार्‍यांच्या कंपूत जेव्हा राज्याचे गृहराज्यमंत्री आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सामील होतात, तेव्हा समाज म्हणून आपलीच आपल्याला लाज वाटायला लागते.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वक्तव्य असंवेदनशील आहे. माध्यमांनीच आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला अशी सारवासारव करण्यात आता काहीच अर्थ नाही. शासन म्हणून कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, याचा जणू कदम यांना विसर पडला असावा. कदाचित नैतिकदृष्ट्या तरुणीला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून ही जबाबदारीच झटकण्याचा योगेश कदम यांनी प्रयत्न केला असावा. अत्याचार झाला, पण मुलीने विरोध केला नाही म्हणजे ते या आरोपीला अप्रत्यक्षरित्या क्लिन चीट देत आहेत का?

एसटी बस आगारात सुरक्षा रक्षक तैनात असतानाही तरुणीची अब्रू लुटली जाते, याचे गांभीर्य त्यांना वाटत नाही का? जेव्हा समाजातूनच असे प्रश्न उपस्थित होऊ लागतात, तेव्हा सामाजिक दबावापोटी लैंगिक अत्याचाराला बळी ठरलेल्या महिला पुढे येण्याचे टाळतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. यातूनच मग पुन्हा महिलांच्या हतबलतेचा फायदा नराधम पुरुषांकडून घेतला जातो, मग तो कुणाचा शेजारी असतो किंवा ऑफिसमधला सहकारी वा बॉस. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार राज्यात महिलांविरोधातील अत्याचाराची दररोज १३० ते १५० प्रकरणे नोंदविली जातात.

भारतात दर १६ मिनिटांनी एक महिला लैंगिक अत्याचाराची बळी ठरते. शहर, गावखेड्यांचा विकास होत असताना सामाजिक मूल्य मात्र हरवत चालले आहे. महिलांसोबत कुठेही, कधीही अत्याचाराच्या घटना घडू शकतात, याला महिलांचे वागणे, बोलणे, त्यांनी घातलेले कपडे हे सर्व कारणीभूत नसून पुरुषांची विकृत मानसिकता आहे. योगेश कदम यांनी याप्रकरणी अधिक संवेदनशीलपणे बोलायला हवे होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. योगेश कदमांचे कान त्यांनी टोचले हे बरे झाले. पण सोशल मीडिया नावाच्या चावडीवर महिला अत्याचाराविषयी व्यक्त होताना सर्वसामान्यांनीही थोडी संवेदनशीलता बाळगायला हवी.