HomeसंपादकीयओपेडFinancial Discipline : तरुणाईला हवं आर्थिक शिस्तीचं कोंदण!

Financial Discipline : तरुणाईला हवं आर्थिक शिस्तीचं कोंदण!

Subscribe

आज देशात अशी परिस्थिती आहे की जेवढी मुलं उच्चशिक्षित होत आहेत. तेवढीच ती स्वच्छंदही होत आहेत. उभी हयात नोकरी करुन काही हजारो रुपयांच्या पेन्शनवर जगणार्‍या आईबापापेक्षा आपण महिना लाखो कमवणारे किती हुशार या अर्विभावात आजची पिढी जगताना आपल्या आजूबाजूला दिसत आहे. खरं तर आपल्याला आयुष्यात नक्की काय हवंय हेच न उमगलेली ही आजची पिढी कितीही आर्थिक स्वातंत्र्याच्या बाता मारत असली तरी ती अनिश्चिततेच्या वावटळीत भरकटलेली आहे. पैसा कमावणे, सुखासीन आयुष्य जगणे हेच जीवन असा समज असल्याने त्यांना पुढे विपरित परिणामांना सामोरे जावे लागते. यामागे आपलाच आर्थिक बेशिस्तपणा कसा कारणीभूत आहे हेदेखील त्यांना कळत नाही. यामुळे आपल्याच विश्वात रमणार्‍या या तरुणाईला व्यावहारिक ज्ञानाचे कोंदण लहानपणापासूनच देणं ही पालकांची आता नवी जबाबदारी आहे.

प्राचीन काळापासून अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. कारण जगण्यासाठी अन्न लागतंच, राहण्यासाठी घर म्हणजेच निवारा लागतोच आणि शरीर झाकण्यासाठी वस्त्र तर हवंच. पण जसजसा काळ पुढे जात आहे तसतशा या मूलभूत गरजांमध्ये पैसा नावाच्या घटकाचाही समावेश झाला आहे. त्यासाठी आश्चर्य वाटण्याची गरज नाही. कारण जगण्यासाठी ज्या अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी लागतात, त्या फक्त पैशांनीच विकत घेता येतात. यामुळे आज प्रत्येकासाठी पैसा मिळवणे, तो कमावणे आणि टिकून ठेवणे गरजेचे झालं आहे. ज्याला या सगळ्यांचा समतोल राखता येतो त्याला पैशांची चिंता नसते, तो शांत झोपू शकतो. पण ज्याला यातला समतोल कसा राखावा तेच कळत नाही तो मात्र लाखो कमवूनही रिकामाचं राहतो. हे सांगण्याचं कारण म्हणजे आजची पिढीही याच कॅटेगरीमध्ये येत आहे. फक्त कमावणे आणि खर्च करणं याच नियमावर जगणारी आजची पिढी याच पैशाच्या टेन्शनने हबकली आहे. म्हणूनच आर्थिक चिंतेने सर्वाधिक ग्रस्त असलेल्या देशांच्या नागरिकांमध्ये आपल्या तरुणाईचाही समावेश आहे.

यामुळेच आज भारतात, आर्थिक चिंता ही एक महत्त्वाची समस्या बनली आहे. याचे मुख्य कारण आहे आर्थिक साक्षरतेचा अभाव. आपल्याकडे अनेकांना बजेट, बचत, गुंतवणूक आणि कर्ज व्यवस्थापन कसं करावं याची बेसिक माहितीही नाही. कारण आपल्या कुठल्याच अभ्यासक्रमात याचा समावेश नाही. त्यामुळे मुलं किती उच्च शिक्षण घेत असली तरी त्यांना कमावते झाल्यानंतर पैशाचे व्यवस्थापन कळत नाही. हेदेखील आजच्या तरुणाईच्या फायनान्शियल स्ट्रेसचे कारण आहे.

दरम्यान, आपल्याकडे गेल्या काही वर्षात आयटीसह इतर खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे गलेलठ्ठ पगाराबरोबर येणारं महागडं लाईफस्टाईल ही आजच्या तरुणाईची गरज झाली आहे. पण आर्थिक नियोजनाबद्दल अज्ञान असल्याने हायफाय कपडे, महागड्या गाड्या, आलिशान घर, दिमतीला नोकर-चाकर, फॉरेन ट्रिप्स हा स्टेटस सिम्बॉल बनला आहे. हा स्टेटस वाढवण्यासाठी सतत वाढत्या पगाराच्या नोकर्‍या शोधण्याकडे आजची तरुणाई वळली आहे. यामुळे उभी हयात जे जन्मदात्या बापाला जमलं नाही ते आताची पोरं करून दाखवू लागली आहेत. यामुळे पोरांच्या या भपकेबाजाला आईवडीलही बळी पडत असून मुलाने अजून श्रीमंत व्हावे यासाठी त्याला सतत नव्या नोकरीचा शोध घेण्याचा सल्लाही घरातूनच मिळू लागला आहे. परिणामी मुलं मनाने अस्थिर झाली असून आपल्यापुढे कोणी जाऊ नये या विचाराने ग्रस्त झाली आहेत. कुटुंबापेक्षा, भविष्य सुरक्षित करण्यापेक्षा आपले स्टेटस जपण्यासाठी ही पिढी सतत धडपड करत असून यात अनेक वेळा नैराश्य आल्याने किंवा अपेक्षित जॉब न मिळाल्याने ही पिढी स्ट्रेसमध्येच जगू लागली आहे.

तर दुसरीकडे नोकरीची असुरक्षितता हे भारतातील आर्थिक चिंतेचे आणखी एक प्रमुख कारण आहे. भारतातील जॉब मार्केट अत्यंत स्पर्धात्मक आहे. त्यामुळे बेकारीची कुर्‍हाड कोणावर केव्हा कोसळेल हे सांगता येत नाही. यामुळे चंगळवाद हेच आयुष्य असा समज या पिढीचा झाल्याने नोकरी गेल्यास किंवा कंपनीने अचानक ले ऑफ केल्यास, कामाचा ताण वाढल्यास पुढे काय असा प्रश्नही या पिढीला सतत भेडसावत आहे. परिणामी तरुण वयातच बीपी, डायबिटीस, नैराश्य यासारख्या व्याधींनी आजची तरुण मुले-मुली ग्रस्त झाली आहेत. यातूनच याचवर्षी एका आंतरराष्ट्रीय कंपनीत गलेलठ्ठ पगारावर काम करणार्‍या तरुणीने कामाच्या ताणामुळे स्वत:ला संपवले. त्याआधीही चैन्नईत काम करणार्‍या तरुणाने कामाचा ताण सहन न झाल्याने स्वत:ला संपवले. यामुळे वजनदार पगाराबरोबरच तेवढ्याच तोलाची जबाबदारी पेलण्यात ही पिढी सपशेल फेल ठरत असल्याचे अनेक घटनांमधून अधोरेखित होत आहे. नोकरी स्वीकारताना जबाबदारीचा विचार न करता केवळ त्यामोबदल्यात मिळणार्‍या पैशांचा विचार करुन नोकरी स्वीकारणारी ही पिढी अपेक्षित जॉब आणि लाखो रुपये पगार घेऊनही अपूर्णच आहे. कारण सतत पुढे जाण्याच्या स्पर्धेमुळे या पिढीला इतके महत्त्वाकांक्षी बनवले आहे की, आपल्याला कंपनी ज्या कामासाठी पाच आकडी पगार देत आहे ती आपल्याला राबवून घेणारच हे या पिढीला उमगत नाही.

यामुळेच आजची ही पिढी भपकेबाजपणाला बळी ठरत असून त्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करून स्वप्न पूर्ण करत आहेत. याच कार्डवरून मग गरज नसताना फक्त देखाव्यासाठी, स्टेटससाठी ब्रँडेड कपडे, वस्तू, गाड्या, यासारखे शौक पूर्ण करत आहे. पण क्रेडिट कार्डचा वापर नक्की केव्हा करावा आणि केव्हा करू नये किंवा टाळावा याचं भान मात्र या पिढीकडे नाही. परिणामी कंपनीच्या कॉस्ट कटींगमध्ये अचानक नोकरी गेल्याने इएमआयच्या विचाराने सैरभैर होताना दिसते. पैसा कसा जपून वापरावा हे या पिढीपैकी फार कमी जणांना कळत आहे. यामुळे पैसे नसल्यास क्रेडिट कार्ड किंवा बँकातून फक्त चंगळ करण्यासाठी, लाईफस्टाईलवर खर्च करण्यासाठी पैसे काढण्यात भारतीय इतर देशवासीयांपेक्षा पुढे आहेत. तर दुसरीकडे सगळ्याच क्षेत्रात स्पर्धा असल्याने हल्ली मुलांना एक नोकरी सोडली की दुसरी जरी लवकर मिळत असली तरी या खासगी क्षेत्रांची खात्री नसल्याने स्वत:च्या या उधळपट्टीवर बंधन घालणे आवश्यक आहे. आज हातात खुळखुळणारा पैसा उद्या कधी संपेल हे समजण्याचं भान या पिढीने पाळायला हवं. अन्यथा आर्थिक चिंतेतून निर्माण होणार्‍या ताणातून पिढ्यानपिढ्या ते कधीही मुक्त होऊ शकणार नाहीत.

आज देशात अशी परिस्थिती आहे की जेवढी मुलं उच्चशिक्षित होत आहेत तेवढीच ती स्वच्छंदही होत आहेत. उभी हयात नोकरी करुन काही हजारो रुपयांच्या पेन्शनवर जगणार्‍या आईबापापेक्षा आपण महिना लाखो कमवणारे किती हुशार या अर्विभावात आजची पिढी जगताना आपल्या आजूबाजूला दिसत आहे. खरं तर आपल्याला आयुष्यात नक्की काय हवंय हेच न उमगलेली ही आजची पिढी कितीही आर्थिक स्वातंत्र्याच्या बाता मारत असली तरी ती अनिश्चिततेच्या वावटळीत भरकटलेली आहे. पैसा कमावणे, सुखासीन आयुष्य जगणे हेच जीवन असा समज असल्याने माणसांपेक्षा पैशांवर नितांत प्रेम करणारी ही आजची पिढी आहे. परिणामी नातेसंबंधाविना मनसोक्त जगणारी ही पिढी बँक खातं रिकामं बघून अनेक रात्री भेदरून झोपतदेखील नाही. पण यामागे आपलाच आर्थिक बेशिस्तपणा कसा कारणीभूत आहे हेदेखील त्यांना कळत नाही. यामुळे आपल्याच विश्वात रमणार्‍या या तरुणाईला व्यावहारिक ज्ञानाचे कोंदण लहानपणापासूनच देणं ही पालकांची आता नवी जबाबदारी आहे.