सतना : देशातील पाच राज्यांमध्ये विधासभेच्या निवडणुका पार पडत आहे. यांतील मिझोराम राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. तर छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 17 नोव्हेंबरला होणार आहे. तर मध्य प्रदेशातही 17 तारखेलाच मतदान होणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अनेक मोठ्या नेत्यांकडून निवडणुकीचा प्रचार करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल (ता. 09 नोव्हेंबर) गुरुवारी मध्य प्रदेशातील सतना येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये त्यांनी भाजपसाठी मतदारांचे एक मत हे तीन प्रकारे कशा पद्धतीने काम करेल, याबाबत सांगितले. (One vote for BJP will do three things, PM Narendra Modi appeals to voters in Madhya Pradesh)
हेही वाचा – शरद पवारांचं एक पत्र आणि 52 जातींचा ओबीसीत समावेश; बच्चू कडूंनी थेट सांगितलं, खरे ओबीसी नेते…
यावेळी सभेत भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विविध सरकारी योजनांचा निधी स्वतःच्या पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसच्या काळात उघडण्यात आलेली सुमारे 10 कोटी बनावट बँक खाती, केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर आम्ही बंद केली. अशा भ्रष्टाचारी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपला मतदान करा. भाजप सरकारने गरिबांसाठी देशभरात सुमारे 4 कोटी पक्की घरे बांधून दिली आहेत, अशी माहिती पंतप्रधानांकडून देण्यात आली.
तसेच, तुमचे एक मत हे त्रिशक्ती आहे, तुमचे एक मत हे मध्य प्रदेशात भाजपला पुन्हा सत्ता देईल, केंद्रातील मोदी सरकारला आणखी बळ देईल आणि भ्रष्टाचारी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवेल, अशा प्रकारे तुमचे एक मत काम करेल, असे आवाहन मोदींकडून करण्यात आले. काँग्रेसकडे मध्य प्रदेशच्या विकासाचा कोणताही आराखडा नाही. जेव्हा मध्य प्रदेशात भाजपचे आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार होते तेव्हा, मध्य प्रदेशच्या विकासाबाबत केंद्रातील काँग्रेसप्रणित सरकारकडून पावला पावलावर अडथळे उत्पन्न केले जात होते. मात्र त्यानंतर केंद्रातही जेव्हा भाजपचे सरकार आले तेव्हा राज्याच्या विकासासाठी डबल इंजिन फायद्याचे ठरले, असे मोदींकडून यावेळी सांगण्यात आले.
काँग्रेसने भ्रष्टाचार करत गरिबांचा हक्क हिरावून घेतला होता तो भाजपने मिळवून दिला. काँग्रेसच्या काळात ‘टू-जी’, हेलिकॉप्टर, कोळसा आणि अन्य विविध गैरव्यवहार झाले. काँग्रेसच्या काळात दलालांना सुगीचे दिवस होते. मात्र, त्यांच्या दुर्दैवाने 2014ला देशवासीयांनी देशाच्या चौकीदाराला निवडून दिले आणि भ्रष्टाचाऱ्यांचे नुकसान होऊन देशवासीयांचे कोट्यवधी रुपये वाचले, असे सांगत काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सडकून टीका करण्यात आली.