Tuesday, March 18, 2025
27 C
Mumbai
Homeमनोरंजन100th Marathi Natya Sammelan : 100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात

100th Marathi Natya Sammelan : 100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात

Subscribe

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. दीप प्रज्वलनानंतर श्रीफळ वाढवून नटराजाच्या चरणी नतमस्तक होत या महोत्सवाचा शुभारंभ झाल्याची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक.वामन केंद्रे, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांसोबत नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे तसेच कार्यकारिणी सदस्य आणि नियामक मंडळ सदस्य उपस्थित होती. नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे, शशी प्रभू यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देत सन्मान करण्यात आला. (100th Marathi Natya Sammelan Mumbai Regional Natya Mahotsav Is Started)

‘मराठी व्यतिरिक्त इतर भाषेत वावर असणारे दिग्दर्शक वामन केंद्रे, अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांसारख्या मान्यवरांचा वावर या नाट्य महोत्सवात असणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी यावेळी सांगितले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून त्याला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, असा आशावाद अजित भुरे यांनी व्यक्त केला.

तर, ‘या नाट्यमहोत्सवाचा भाग होता आल्याचा आनंद नक्कीच आहे. मराठी नाटकाशी असलेल्या नात्याचा मला अभिमान आहेच. इतरत्र काम करताना मराठी नाटकाच्या समृद्ध वारसाकडे आदराने पहिले जाते तेव्हा मन खऱ्या अर्थाने सुखावते’, अशी भावना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली. मंचावर असलेली मान्यवर मंडळी प्रेरणास्त्रोत आहेत, त्यांच्यासोबत आज मला येथे उपस्थित राहायला मिळतंय हे खरंच भारावून टाकणार आहे. मी यापुढेही कायम रंगभूमीची सेवा करत राहणार, असं प्रतिपादनही सोनाली कुलकर्णी यांनी केलं.

याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे म्हणाले की, ‘आज एवढ्या वर्षानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या प्रयत्नांमुळे मराठी भाषेव्यतिरिक्त एवढा मोठ्या नाट्यमहोत्सवाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले हे खरंच कौतुकास्पद आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आपल्या ध्येयाच्या दिशने ज्या पद्धतीने एक एक पाऊल पुढे टाकते आहे, त्यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजॆ. जग झपाट्याने बदलत चाललं आहे. त्यासाठी नाटकाच्या माध्यमातून मराठीच्या बाहेर जाऊन बघण्याचा प्रयत्न तितक्या गांभीर्याने आजवर झाला नाही. वेगवेगळ्या भाषेतील नाटकाच्या माध्यमातून दृष्टिकोन बदलण्याची सुरुवात करता येऊ शकते. त्यासाठी अशा नाट्यमहोत्सवाची अत्यंत गरज होती, ही सुरुवात आहे. संघटनेत वेगवेगळ्या विचारधारेची माणसं एकत्र आली की, बदल घडतो. हे बदल आज एवढ्या वर्षाने प्रकर्षाने दिसू लागले आहेत त्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित होणाऱ्या प्रत्येक उपक्रमाचं कौतुक झालं पाहिजे.

कार्यक्रमाच्या अखेरीस नाट्य परिषदेचे सहकार्यवाह दिलीप कोरके यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि रसिकांचे आभार मानले. अक्षरिक (बंगला) अनीक थिएटर, कोलकता या नाटकाने या महोत्सवाची सुरुवात झाली. 20 फेब्रुवारी ते 2 मार्च पर्यंत भारतीय भाषांमधील हा नाट्य महोत्सव यशवंत नाट्य मंदिर, जयश्री आणि जयंत साळगांवकर प्रायोगिक रंगमंच, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह या ठिकाणी रंगणार आहे. बंगाली, तामिळ, इंग्रजी, मराठी अशा वेगवगळ्या भाषांमधल्या नाटकांचं सादरीकरण या विशेष नाट्य महोत्सवात होणार आहे.

हेही पहा –

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorced: युजवेंद्र- धनश्रीचा घटस्फोट, कोर्टात सांगितलं वेगळं होण्याचं कारण