देवदासला २० वर्षे पूर्ण! चित्रपटाचं बजेट ५० कोटीपर्यंत गेल्याने निर्मात्याला झाली होती अटक

देवदास या चित्रपटाला आज २० वर्षे पूर्ण झाली असून २० वर्षांनंतरही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला आहे.

devdas movie

हिंदी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट बनले आहेत, ज्यांना आयकॉनिक म्हटले जाते. हे चित्रपट म्हणजे चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचं योगदान मानले जातात. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात गौरवले जातील असे अनेक चित्रपट गेल्या काही वर्षांत तयार झाले आहेत. त्यातीलच एक म्हणजे देवदास. देवदास या चित्रपटाला आज २० वर्षे पूर्ण झाली असून २० वर्षांनंतरही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला आहे. (20 years of devdas movie The producer was arrested as the budget of the film went up to Rs 50 crore)

कलाकारांचा अभिनय, भव्य सेट, वेशभुषेमुळे हा चित्रपट भव्यदिव्य बनला होता. २० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला तेव्हा प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. सगळ्याच बाबतीत अव्वल ठरलेल्या या चित्रपटातील काही रंजक गोष्टी आपण जाणून घेऊयात.

शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दिक्षित या त्रिकुटाचा हा चित्रपट १२ जुलै २००२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील प्रत्येक लहान-सहान गोष्टीवर लक्ष देण्यात आले होते. सेट, कपडे, मेकअप, हावभाव आदी सर्व गोष्टींवर विशेष लक्ष दिलं होतं. म्हणूनच हा चित्रपट २० वर्षानंतरही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या चित्रपटाचं बजेट ५० कोटींवर पोहोचलं होतं.


चित्रपटाच्या चित्रीकरणाकरता तीन वेगवेगळ्या प्रकारचे सेट तयार करण्यात आले होते. यामध्ये चंद्रमुखीचा कोठा सर्वांत महाग होता. यासाठी तब्बल १२ कोटींचा खर्च करण्यात आला होता. चित्रपटातील पारो म्हणजेच ऐश्वर्या रायचं घरही अलिशान दाखवण्यात आलं होतं. या घरासाठी वास्तू विशारदांनी भरपूर मेहनत घेतली होती. तसेच, डिझाइनसाठी संजय लिला भन्साळी यांना खूप वेळ लागला होता. स्टेन्ड ग्लासपासून हे घर तयार करण्यात आलं होतं. ज्यामध्ये गुलाबी आणि निळ्या रंगांचा वापर करण्यात आला होता. यासाठी तब्बल ३ कोटींचा खर्च करण्यात आला होता.

माधुरी दिक्षित आणि ऐश्वर्याच्या वेशभुषेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यासाठी डिझायनर्स आणि संजय लीला भन्साली यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. चंद्रमुखीचा लेहेंगा आणि पारोच्या साडीसाठी कॉस्च्युम डिझायनरने कोलकत्ताच्या बाजारातही फेरफटका मारला होता.

पारोसाठी या चित्रपटात तब्बल ६०० साड्या खरेदी केल्या होत्या. या सर्व साड्या एकत्र करून डिझायनरने कॉस्च्युम तयार केला होता. साड्यांना रॉयल आणि एलिगेंट लुक देण्यासाठी २-३ साड्या एकत्र केल्या होत्या. तसंच, साड्यांची लांबीसुद्धा वाढवण्यात आली होती.

२० वर्षांपूर्वी एवढा अवाढव्य चित्रपट तयार करण्याचं धाडस संजय लीला भन्साळी यांनी दाखवलं. त्यामुळे हा चित्रपट तयार व्हायलाही बराच वेळ लागला. तसंच, या अवाढव्य काराभारासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही करण्यात आला होता. हा चित्रपट तब्बल ५० कोटींचा असल्याचं म्हटलं जातंय. २० वर्षांपूर्वी ५० कोटींचा आकडा निश्चितच जास्त मानला जायचा. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते भरत शाह यांना अटकही झाली होती. या चित्रपटासाठी अंडरवर्ल्डकडून पैसा घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे काही काळाकरता चित्रपटाचं चित्रिकरणही थांबवण्यात आलं होतं.