Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनKirtan Movie : रुपेरी पडद्यावर इतिहास घडवणारा भव्य चित्रपट!

Kirtan Movie : रुपेरी पडद्यावर इतिहास घडवणारा भव्य चित्रपट!

Subscribe

ग्लॅमरस आणि मनोरंजनप्रधान विषयांपासून वेगळ्या वाटेवरचा एक अनोखा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे! मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक अतुल जगदाळे यांच्या ‘कीर्तन’ या आगामी चित्रपटाविषयी सध्या चित्रपटसृष्टीत विशेष चर्चा सुरु असल्याचे ऐकिवात येत आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेवर आधारित हा भव्यदिव्य चित्रपट प्रेक्षकांना वेगळ्या विश्वात घेऊन जाईल असे जाणकार सांगत आहेत. या चित्रपटाची निर्मिती ‘अतुल जगदाळे प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या बॅनरखाली होत असून, तो आतापासूनच उत्कंठतेचा विषय ठरला आहे.

अध्यात्म – एक नवा प्रयोग 

‘कीर्तन’ हा चित्रपट केवळ संतपरंपरेवर आधारित धार्मिक चित्रपट नसून, त्याला एक भव्य दृष्टीकोन देण्यात आला आहे. कीर्तनकारांच्या जीवनावर प्रकाश टाकत, त्यामधील संघर्ष आणि समाजप्रबोधनाचे महत्त्व उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून होणार आहे. भव्य सेट्स, अप्रतिम छायांकन आणि दमदार कथा यामुळे हा चित्रपट केवळ इतिहास नव्हे, तर समकालीन रसिकांसाठीही एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव असणार आहे.

कलावंत कोण असतील? संगीत कोणाचे? – उत्सुकता वाढली

‘कीर्तन’ म्हटलं कि ओघाने संगीत-लोकसंगीत आलंच. त्यामळे चित्रपटसृष्टीत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे ‘कीर्तन’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा कोणाच्या हाती असणार? या विषयाला अत्यंत प्रभावी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या सुरांची नस जाणणाऱ्या प्रतिभावंत संगीतकारांपैकी नेमकी कोणाकडे ही धुरा सुपूर्द होणार? कीर्तनात कोणत्या गायकांचा स्वर तल्लीन करणार? या चर्चांना उधाण आले आहे. तसेच या भव्य चित्रपटात कोणकोणत्या दिग्गज कलावंतांची वर्णी लागणार आहे याविषयीसुद्धा कमालीचे औत्सुक्य आहे. निर्माते-दिग्दर्शक अतुल जगदाळे यांनी यासंदर्भात गुप्तता राखली असली, तरी ‘लवकरच मोठी घोषणा होईल’ असे त्यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे चित्रपटप्रेमींच्या उत्कंठेला आणखी उधाण आले आहे.

‘गणवेश’च्या यशानंतर नवा प्रयोग

‘गणवेश’ या सामाजिक आशयाच्या चित्रपटानंतर तीन- चार वर्षांपासून अतुल जगदाळे यांनी एका भव्य दिव्य हिंदी चित्रपटावर काम सुरु केले आहे. त्यासोबत त्यांनी आपल्या मातृभाषेतील कलाकृतीलाही विशेष प्राधान्य देत मराठी माणसाला प्रिय असलेले ‘कीर्तन’ भव्य रुपेरी पडद्यावर सादर करण्याचा प्रयोग करत आहेत. अतुल जगदाळे यांना कलावंत तंत्रज्ञ निवडीची अचूक जाण आहे. त्यांच्या ‘गणवेश’मध्ये दिलीप प्रभावळकर, मुक्ता बर्वे, किशोर कदम, स्मिता तांबे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे ‘कीर्तन’मध्ये कोणती स्टारकास्ट असणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा : Me Pathishi Aahe Movie : नव्या युगातील स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रेरणादायी गाथा


Edited By : Prachi Manjrekar