घरमनोरंजनप्रत्येकीला आपल्यातीलच एक वाटणारी स्मिता !

प्रत्येकीला आपल्यातीलच एक वाटणारी स्मिता !

Subscribe
भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक फिल्मी सितारे आहेत जे काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर विस्मृतीत गेले. मात्र काही अपवाद असे आहेत ज्यांनी अभिनयकौशल्याची अशी काही चुणूक दाखवली की, स्वतःचे विस्मरणच होऊ दिले नाही. अभिनेत्री स्मिता पाटिल हे असंच एक अजरामर नाव. आज 17 ऑक्टोबर म्हणजे स्मिता पाटील यांचा वाढदिवस. 17 ऑक्टोबर 1955  साली जन्मलेल्या स्मिताचा 13 डिसेंबर 1986 साली अकाली मृत्यू झाला, त्यावेळी ती अवघ्या 31 वर्षांची होती. एवढ्या कमी कालावधीतही अभिनय कारकिर्दीतील फक्त दहा वर्षांत स्मिताने त्यावेळी ऐंशीहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. फक्त मराठी किंवा हिंदीच नव्हे तर गुजराथी, कन्नड, मल्याळम या भाषांतील चित्रपटांमध्येही तिच्या अभिनयाची चुणूक दिसली होती.
स्मिता ग्लॅमरस वैगैरे म्हणतात तशी नव्हती. ती तशी साधी, सावळी, मध्यमवर्गीय चेहरेपट्टी लाभलेली पण तिच्या नजरेत विलक्षण तेज होते. वडील शिवाजीराव गिरधर पाटील ते राजकारणात होते आणि आई विद्याताई पाटील समाजसेविका होत्या. स्मिताच्या अगदी लहानपणापासून स्मिताच्या घरात सेवादलाच्या विचारसरणीचा प्रभाव होता. त्यामुळे राष्ट्र सेवादलाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत स्मिताचा सहभाग असायचा. चळवळीशी ओळख झालेल्या स्मिताचा स्वभाव तसा जिद्दी, बंडखोर असल्यामुळे ती नेहमीच तिच्या निर्णयावर ठाम होती. चित्रपटात काम करण्याच्या तिच्या निर्णयावर घरच्यांचा  विश्वास असल्यामुळे त्यातही तिची अडवणूक झाली नाही.
चित्रपटात येण्यापूर्वी स्मिता मराठी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिकेचे काम करायची. तिथेच  स्मिताला श्याम बेनेगल यांनी हेरले आणि  ‘चरणदास चोर’ या  चित्रपटात संधी दिली. 1974पासून हिंदी चित्रपटात प्रवेश केलेल्या स्मिताने आपल्या प्रारंभीच्या चित्रपटापासूनच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 1970 ते 1980 च्या दशकात बॉलीवूडमध्ये समांतर चित्रपटांची लाट आली. थेट जगण्याचे प्रश्न मांडणारे चित्रपट आले. समांतर अथवा कलात्मक चित्रपट असे त्यांना समजले जाऊ लागले. तिला मिळालेल्या अनेक भूमिका पीडित, शोषित स्त्रीच्या असायच्या.  या भूमिका करताना स्मिताने चाकोरीबाहेरची स्त्री दाखवली. ‘चक्र’मधील अम्मा झालेल्या स्मिताचा झोपडपट्टीतील अंघोळीचा सीन वादग्रस्त ठरला. भूमिकेची गरज म्हणून तिने तो केला असला तरी त्यात कुठलाही हिडीसपणा नव्हता. ‘उंबरठा’ चित्रपटातील सुलभा महाजन ही व्यक्तिरेखा साकारताना तिची चौकटीबाहेर जाण्याची धडपड स्मिताने जिवंत उभी केली. शोषित स्त्रियांच्या वेदना, अत्याचार तिला अस्वस्थ करायचे. बहुदा हेच कारण होते की , त्या  भूमिका करताना आपल्या भावना, वेदना स्मिता पडद्यावर साकारते, असे प्रत्येकीलाच वाटायचे. ती आपल्यातीलच कुणीतरी एक आहे असा विश्वास तिने स्त्रियांच्या मनात निर्माण केला होता.
तिची पावलं जेंव्हा व्यावसायिक सिनेमांकडे वळली आणि  दर्शकांनी ‘शक्ती’, ‘नमकहलाल’, ‘कसम पैदा करनेवालों की’ यासारखे चित्रपट करताना स्मिताला पाहिले, तेंव्हा त्यांना आश्चर्य वाटले. ग्लॅमर नसतानाही केवळ अभिनयाच्या सामर्थ्यावर तिने व्यावसायिक चित्रपटांत स्वतःला सिद्ध केले नाही तर  यशही संपादन केले.
स्मिताच्या एकूण कारकिर्दीत तिला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले तर एक फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. 1985 मध्ये तिची दखल भारत सरकारनेही घेतली आणि देशातला चौथा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे ‘पद्मश्री’ बहाल करण्यात आला. भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, 3 मे 2013 रोजी तिच्या सन्मानार्थ इंडिया पोस्टने तिचा चेहरा असलेले टपाल तिकीट प्रसिद्ध केले. हि तिच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाची खरी पोच पावती म्हणायला हवी !
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -