मराठी प्रेक्षकांसाठी मालिका म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय. या मालिकांची मेजवानी देणाऱ्या अनेक मराठी वाहिन्या सध्या उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कलर्स मराठी वाहिनी. कलर्स मराठी ही वाहिनी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. याच वाहिनीवर सुरू असलेल्या ‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत आज एक नवा अध्याय उलगडणार आहे. देवीने मडक्यात बंदिस्त केलेले दैवत्व, चुकीच्या हाती जाऊन विध्वंस होऊ नये म्हणून ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांच्या विनंतीवरून तुळजाने ते परत स्वीकारले आणि अष्टभुजेस्वरूप धारण केले. मात्र, या प्रवासात देवीने स्पर्श केलेला पाषाण प्रकाशमान होतो आणि पुढे तो चिंतामणी पाषाण म्हणून ओळखला जातो. या पाषाणाचा अगाध महिमा आणि त्याचे रहस्य आज प्रेक्षकांना समजणार आहे. याआधी सधवा आणि विधवा हा सनातन सुरू असलेला वादाचा मुद्दा आई तुळजाभवानीने खूप सोप्प्या शब्दांत सोदाहरण समजावून सांगितला. तसेच देवीने स्त्रीत्वाच्या सन्मानाचा मुद्दा भक्तांसमोर मांडला. जो प्रत्येक स्त्रीला बळ देणारा ठरला. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत या आठवड्यात दैवत्वाचा प्रवास आणि चिंतामणी पाषाणाचा अनमोल ठेवा अनुभवता येणार आहे. पाहा चिंतामणी पाषाणाचा अगाध महिमा 20 नोव्हेंबरपासून रात्री 9 वाजता ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत.
चिंतामणी पाषाण हा हिंदू धर्मातील श्रद्धेचा आणि भक्तीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. चिंतामणी म्हणजे चिंता दूर करणारा, मनातील इच्छा पूर्ण करणारा पाषाण. हा पाषाण देवी तुळजाभवानीच्या कथा आणि दैवी चमत्कारांशी जोडला गेलेला आहे. चिंतामणी पाषाणाला दैवी ऊर्जा आणि देवीची उपस्थिती दर्शवणारे मानले जाते. त्याला स्पर्श करून मनोकामना व्यक्त केल्यास ती पूर्ण होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. चिंतामणी हा केवळ पाषाण नाही, तर तो विश्वास, श्रद्धा आणि भक्तीचा आधार आहे. देवी तुळजाभवानीची कृपा आणि तिच्या दैवी स्वरूपाचे ते प्रतीक मानले जाते. देवी भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा हा कथाभाग असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्याची विशेष उत्सुकता आहे.
आई तुळजाभवानीच्या अश्या असंख्य लीला आणि दैवी चमत्कार या मालिकेत पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा : Gulkand Movie : ‘गुलकंद’ हा नवा चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित
Edited By – Tanvi Gundaye