अंकुश-स्वप्निल नाही तर ‘हा’ कलाकार ठरला ‘लकी’!

संजय जाधव यांचा लकी हा मराठी चित्रपट ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीतील तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात प्रमुख अभिनेता म्हणून एका नवीन अभिनेत्याला संधी मिळाली आहे.

Abhay Mahajan-Dipti Sati
अभय महाजन- दिप्ती सती

संजय जाधव यांनी आपल्या आगामी ‘लकी’ सिनेमाची घोषणा केली आणि त्यामध्ये कलाकार कोण असतील? याविषयी उत्सुकता निर्माण झाली. सई ताम्हणकर, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, स्पृहा जोशी, श्रेया बुगडे, सोनाली खरे या कलाकारांनी तेच ‘लकी’ कलाकार असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलं. मात्र आता दिग्दर्शक संजय जाधव यांनीच आपल्या ‘लकी’ हिरो-हिरोइनची घोषणा केली.

प्रत्येकजण आपल्या चित्रपटाचं हटके प्रमोशन करत असतो. ‘मुरांबा’ या चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने प्रमोशनसाठी केला आणि त्यानंतर मराठी चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियावर हटके पद्धतीने होऊ लागले. त्याचप्रमाणे ‘लकी’ चित्रपटाची स्टार कास्टही हटके पद्धतीने रिव्हील करण्यात आली आहे. लकी चित्रपटासाठी असलेली तगडी स्टार कास्ट रिव्हील करताना त्यांच्यावर एक गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. हे गाणं खास दादांच्या स्टाईलमध्ये चित्रीत करण्यात आलं आहे. हे गाणं बघून नक्कीच चित्रपट बघण्याची उत्सुकता निर्माण होते.

संजय दादांचा नवीन हिरो

संजय जाधव यांचा चित्रपट म्हटलं की अभिनेता स्वप्नील जोशी किंवा अंकुश चौधरी हिरो म्हणून असणार अशी समजूतच प्रेक्षकांची झाली होती. मात्र आता ‘आओ ना फिर’ असं म्हणत संजय जाधव यांनी नवीन हिरोला आपल्या चित्रपटात संधी दिली आहे. अभिनेता अभय महाजन आणि अभिनेत्री दिप्ती सती हे दोघं प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Abhay Mahajan
अभय महाजन

‘अहो, दादा आता सांगा नंबर कुणाचा आला’ या गाण्याचे गीत सचिन पाठक यांनी लिहिले आहे, तर पंकज पडघन यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. अमितराज, सायली पंकज आणि रोहित राऊत यांनी हे धमाल गाणं गायलं आहे. तर कोरिओग्राफर उमेश जाधव यांनी या गाण्याची कोरीओग्राफी केली आहे. येत्या ७ डिसेंबरला हे लकी कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.