अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात गुन्हा दाखल, पत्नीचे गंभीर आरोप

अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात गुन्हा दाखल, पत्नीचे गंभीर आरोप
अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात गुन्हा दाखल, पत्नीचे गंभीर आरोप

मराठीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरोधात पत्नीने मारहाण, मानसिक- शारीरिक छळ केल्या प्रकरणी गुन्ह दाखल केला आहे. पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी स्नेहा हिने अभिनेता पती अनिकेतसह सासू,सासरे यांच्यावरही कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी अनिकेतसह त्याचे आई-वडील यांच्यावर ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६ अशा कलमांखाली गुन्हा दाखल करुन घेतला आहे. पती अभिनेता अनिकेत विश्वासराव,सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघांनी आपली शारीरिक, मानसिक छळ केला असा दावा करत सून स्नेहा विश्वासराव हिने तक्रारीत केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार स्नेहा हिने तक्रारीत म्हटले की, अनिकेत विश्वासराव याने मुंबईतील दहिसर येथील विश्वासराव रेसिडेन्सी येथे १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ दरम्यान कुटुंबाच्या मदतीने मानसिक, शारीरिक छळ करत मारहाण केली. तीन वर्षाच्या काळात सिनेमा सृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीच नाव मोठ होईल, या भीतीने अनिकेतने जीवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अनेकदा नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक देत छळ केला, तसेच सासू, सासरे यांनीही तिच्यावर होणाऱ्या अत्याचार न थांबवता त्या गोष्टींसाठी अनिकेतला पाठींबा दिला असं आपल्या तक्रारीत नमूद केलेय. या तक्रारीनुसार, आता अभिनेता अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण २०१८ साली विवाहबंधनात अडकले. स्नेहा चव्हाण देखील एक अभिनेत्री असून अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेय. स्नेहा चव्हाणची आई राधिका चव्हाण या देखील मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. मात्र स्नेहा आणि अनिकेतमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. यामुळे फेब्रुवारी २०२१ मध्ये स्नेहा माहेरी पुण्यात राहत होती. याच छळाला आणि त्रासाला कंटाळून स्नेहाने पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.


ठाकरे सरकार घेणार सलमान खानची मदत, काय आहे कारण?