शिझानच्या जामिनावर आता 9 जानेवारीला होणार सुनावणी

Actor Sheezan Khan

वसईः तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानच्या जामीन अर्जावर येत्या 9 जानेवारीला सुनावणी होणार आहे. तुनिषा शर्माच्या कुटुंबियांच्या वकिलांनी पुढील तारीख मागितल्याने आजची सुनावणी तहकूब करण्यात आली.

तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिझान खानच्या जामीन अर्जावर शनिवारी वसई कोर्टात सुनावणी होणार होती. पण, तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणात फिर्यादी असलेल्या वनिता शर्मा यांच्यातर्फे त्यांच्या वकिलांनी आजची सुनावणी तहकूब करून पुढील तारीख देण्याची विनंती करण्यात आली. फिर्यादीचे वकिल तरुण शर्मा हायकोर्टात व्यस्त असून वनिता शर्मा चंढीगढला गेल्याने आजची सुनावणी तहकूब करण्याची मागणी वकिलांनी केली. तर सरकारी वकिलांनी पुढील सुनावणी 13 जानेवारीला घेण्याची कोर्टाला विनंती केली.

यावर कोर्टाने फिर्यादी वकिलांची मागणी मान्य करत आजची सुनावणी तहकूब केली. तर सरकारी वकिलांची मागणी अमान्य करत पुढील सुनावणी 9 जानेवारीला ठेवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आपले म्हणणे मांडले असून पुढील सुनावणीत शिझानच्या वकिलांना म्हणणे मांडण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. आजची जामिनावरची सुनावणी लांबल्याने शिझानचा तुरुंगातील मुक्काम आणखी काही काळ वाढणार आहे.

दरम्यान, गेल्या सुनावणीत शिझानच्या वकिलांनी त्याचे केस कापू नयेत अशी विनंती केली होती. त्यावर कोर्टाने शिझानला दिलासा देत एक महिना केस कापू नयेत, असे आदेश तुरुंग अधिकाऱ्यांना दिले आहेत. आज सुनावणीत शिझानची आई आणि त्याच्या दोन बहिणी कोर्टात हजर होत्या.

तुनिषा शर्मा ही ‘दास्तान-ए-काबुल’ या मालिकेमध्ये काम करत होती. या मालिकेमध्ये ती मुख्य भूमिका साकारत होती. तुनिषा 20 वर्षांची होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तुनिषा फितूर, बार बार देखो, कहानी 2: दुर्गा रानी सिंह, दबंग 3 यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती. तुनिषाने पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘फितूर’ चित्रपटात छोट्या कतरिनाची भूमिका साकारली होती.


हेही वाचा : तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात एक्स बॉयफ्रेंडला अटक