स्पृहा जोशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; मीडियम स्पाइसीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण भूमिका

"मीडियम स्पाइसी"मध्ये कृष्णा नावाच्या एका छोट्याशा पण वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत दिसणार आहे

spruha joshi new marathi movie

अभिनयाबरोबरच लेखन, सूत्रसंचालन, कवितांमध्ये व्यस्त असलेली स्पृहा जोशी आता नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीडिअम स्पाइसी या चित्रपटात तिची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता.  (Actor Spruha Joshi in Medium Spicy Movie)

आशयघन चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी नव्या पिढीतील एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे स्पृहा जोशी. चित्रपट, रंगभूमी आणि टेलिव्हिजनवर लीलया वावरणारी आणि अभिनयाबरोबरच लेखन, सूत्रसंचालन, कविता या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करणारी स्पृहा “मीडियम स्पाइसी”मध्ये कृष्णा नावाच्या एका छोट्याशा पण वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. कृष्णा नक्की कोण आहे? याचा अजून खुलासा झालेला नसला तरी जेवणाच्या थाळीत विविध फ्लेवर्स असल्यावर जसे जेवण परिपूर्ण होते तसेच स्पृहा जोशीच्या कृष्णा या पात्राच्या फ्लेवरमुळे “मीडियम स्पाइसी” चित्रपटातील पात्रांच्या विविध फ्लेवर्सने सजलेली लज्जतदार थाळी परिपूर्ण होणार आहे.

लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, विधि कासलीवाल निर्मित, इरावती कर्णिक लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता या तरुण कलाकारांसह ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, अरुंधती नाग आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या सहज सुंदर अभिनयाने सजलेलया “मीडियम स्पाइसी” ची लज्जतदार डिश १७ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.