‘भागो मोहन प्यारे’ मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल’

‘भागो मोहन प्यारे’ मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल’

१. तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगा.

मी या मालिकेत मीरा गोडबोले नावाची व्यक्तिरेखा निभावतेय. ती खूप शिस्तप्रिय आणि कणखर आहे. तिच्या भूतकाळात अशी काही घटना घडली आहे जिच्यामुळे तिचा पुरुषांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तिला पुरुषांची चीड येते. तिला सगळेच पुरुष सारखे वाटतात आणि त्यांच्यापासून ती २ हात लांबच असते. ती मुळात खूप हळवी आहे पण तिच्या देहबोलीतून ती एक कणखर व्यक्तिरेखा सगळ्यांसमोर आणते जेणेकरून तिच्यासोबत कोणी पंगा घेणार नाही. मीरा गोडबोलेवर मोहन हा प्रेम करतो पण तो तिला काही केल्या ते प्रेम व्यक्त करू शकत नाही आहे.

2. मालिकेचा विषय अगदी वेगळाच आहे, त्याबद्दल काय सांगाल.

नक्कीच मालिकेचा विषय हा खूपच वेगळा आहे. त्यामुळे हि मालिका अबालवृद्ध सगळ्यांनाच आवडेल. त्यात हडळ आहे पण तिच्या त्या भयावह गोष्टीलापण एक विनोदी अंग दिलं आहे. त्यामुळे मालिका पाहताना प्रेक्षक खूप एन्जॉय करतील. झी मराठी वाहिनी नेहमीच वेगळे विषय प्रेक्षकांसाठी सादर करते. जागो मोहन प्यारे मध्ये परी होती या भागात हडळ आहे जिच्यामुळे मोहन संकटात सापडेल. पण प्रेक्षक हि मालिका पाहताना खळखळून हसतील.

3. अतुल परचुरे यांच्यासोबाबत काम करतानाचा अनुभव कसा आहे?

अतुल परचुरे हा अतिशय प्रेमळ माणूस आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं तसंच ते मला माझ्या कामात खूप प्रोत्साहन देतात. त्यांना खूप अनुभव आहे पण त्यांचं वागणं तितकच नम्र आहे. ते फक्त स्वतःचा सिन चांगला व्हावा म्हणून नाही तर पूर्ण सिन चांगला व्हावा म्हणून प्रयत्न करतात. कोणाच्या कामात इंटरफिअर नाही करत पण ते काम कसं अजून चांगलं होईल यासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करतात.

4. मालिकेचे प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षक-चाहत्यांकडून काय प्रतिक्रिया मिळाल्या?

प्रोमो पाहिल्यावर मला खूप उत्साहवर्धक प्रतिक्रिया आल्या. लहान मुलांना प्रोमोज खूप आवडले. तसंच लोकांना खूप कुतूहल आहे कि प्रोमो मध्ये त्या हडळीची जीभ कशी बाहेर येते? ते सर्व कसं चित्रित केलं? त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. प्रेक्षकांची उत्सुकता पाहून मला स्वतःला छान वाटतंय. मला सोशल मीडियावरदेखील अनेक चाहत्यांचे मेसेजेस आले आहेत कि हम तो तेरे आशिक हे नंतर आता पुन्हा मला ते भागो मोहन प्यारे या मालिकेच्या निमित्ताने टीव्हीवर पाहू शकणार आहेत त्यामुळे ते खूप खुश आहेत.

5. ऑफस्क्रीन सेटवर वातावरण कसं असतं?

सेटवर वातावरण खूप खेळीमेळीचं असतं. कारण आमची टीम खूप यंग आहे. आमचे प्रोड्युसर्स खूप यंग आहेत. त्यांची जरी हि पहिली मालिका असली तरीही ते कलाकारांची तितकीच काळजी घेतात. कलाकारांवर कुठलाही दडपण येऊ देत नाही त्यामुळे सेटवर वातावरण हे नेहमीच हलकं-फुलकं आणि खेळीमेळीचं असतं.

First Published on: August 11, 2019 1:28 PM
Exit mobile version