‘आशिकी 2’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्याच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. पण, अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ती एक वेगळच काम करत होती. बऱ्याच बी टाऊन कलाकारांच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे प्रोफेशन वेगळे असल्याचे आपण पाहिले आहे आणि श्रद्धाही त्यापैकीच एक आहे. आज श्रद्धा कपूर हिचा 38 वा वाढदिवस आहे. जाणून घेऊयात तिच्याविषयी
बॉलिवूडमधील लोकप्रिय खलनायक आणि विनोदी अभिनेते शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापूरे यांच्या घरी 3 मार्च 1987 ला श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिचा जन्म झाला. एका दिग्गज अभिनेत्याची मुलगी असली तरी श्रद्धा कपूरला मात्र बॉलिवुडमध्ये संधी काही सहजासहजी मिळालेली नाही. आतापर्यंत श्रद्धानं ‘आशिकी 2’, ‘साहो’, ‘एक विलेन’, ‘छिछोरे’ आणि ‘बागी’ यांसारख्या अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे. श्रद्धा कपूरने भूमिका केलेला स्त्री, स्त्री-2 हा चित्रपट तर बॉक्स ऑफिसवर भरघोस गल्ला जमवणारा ठरला.
श्रद्धाने ‘तीन पत्ती’ चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. पण आज तिने इंडस्ट्रीत स्वतःची एक मजबूत ओळख निर्माण केली आहे. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की स्टार किड्सना इंडस्ट्रीत खूप सहज काम मिळतं. पण काहींच्याबाबतीत ते नक्कीच तेवढं खरं होताना दिसत नाही. श्रद्धाच्या यशामागे तिचा कठीण संघर्ष आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की श्रद्धा कपूरने कधीकाळी आपला खर्च भागवण्यासाठी थेट कॉफी शॉपमध्ये वेटर म्हणून काम केलेलं आहे. श्रद्धा कपूर बोस्टनमध्ये शिकत होती. त्या काळात खर्च भागावा म्हणून श्रद्धा वेटर म्हणून काम करायची. श्रद्धा कपूरने तीन पत्ती या चित्रपटापासून बॉलिवुडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटात तिला छोटी भूमिका मिळाली होती. आज मात्र ती बॉलिवुडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे.
श्रद्धा कपूर 16 वर्षांची असताना तिला ‘लकी नो टाइम फॉर लव’ या सिनेमात काम करण्यासाठी विचारणा झाली होती. पण त्यावेळी ती शाळेत होती आणि तिला सायकॉलॉजिस्ट व्हायचे असल्यानं तिनं सलमान खानच्या या सिनेमात काम करण्याची संधी नाकारली.
श्रद्धाला खरी ओळख मिळाली ती ‘आशिकी 2’ चित्रपटामुळे. या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवलं. इथूनच श्रद्धा कपूरने इतके स्टारडम मिळवलं आणि ती अल्पावधीतच बी-टाउनची टॉप अभिनेत्री बनली. एवढंच नाही तर या अभिनेत्रीला सोशल मीडिया क्वीन देखील म्हटलं जातं. श्रद्धा कपूरचे इंस्टाग्रामवर 94.2 मिलियन फॉलोवर्स आहेत. ती विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2015 मध्ये फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100 च्या यादीमध्ये श्रद्धा कपूरचा समावेश झाला होता. या यादीत तिला 57 वं स्था मिळालं होतं. याशिवाय ‘फोर्ब्स 30 अंडर 30 एशिया’च्या यादीतही तिचा समावेश झाला होता.