‘राडा’ चित्रपटातून अभिनेत्री योगिता चव्हाण झळकणार मुख्य भूमिकेत

राम शेट्टी निर्मित 'राडा' या चित्रपटात योगिता मुख्य भूमिकेत दिसणार असून तिचा रावडी आणि मितभाषी असे दोन्ही लूक या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत

‘राडा’ सिनेमाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजतेय. फुल्ल ऑफ ऍक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या या ‘राडा’ सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांची वाहवा मिळवत असताना आणखी एक सुखद धक्का प्रेक्षकांना मिळणार आहे, तो म्हणजे छोट्या पडद्यावरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री योगिता चव्हाण ‘राडा’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला आली आहे.

राम शेट्टी निर्मित ‘राडा’ या चित्रपटात योगिता मुख्य भूमिकेत दिसणार असून तिचा रावडी आणि मितभाषी असे दोन्ही लूक या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात योगिताचा लव्हेबल अंदाजही प्रेक्षकांना विशेष भावणार आहे. तर योगिताला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प – पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या हा भव्यदिव्य ‘राडा’ या ऍक्शनपट पाहणे नक्कीच रंजक ठरणार आहे.

दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले केले असून चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना व एका गाण्याची धुरा मयुरेश केळकर यांनी सांभाळली असून गाण्याचे बोल जाफर सागर लिखित असून त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे. तर हा भव्य ऍक्शनपट के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या भव्य ऍक्शनपटात योगिता सोबत आणखी कोणते कलाकार दिसणार, हे पाहणं औत्स्युक्याचे ठरणार आहे. येत्या २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर ‘राडा’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा : सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाला वेगळी कलाटणी, गोवा पोलिसांनी दोन जणांवर केला हत्येचा गुन्हा दाखल