बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा ‘इमरजेंसी’ हा सिनेमा थिएटरमध्ये 17 जानेवारीला प्रदर्शित झाला. या सिनेमात अभिनेत्री कंगना रनौतने भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. शिवाय या सिनेमाचे दिग्दर्शन देखील कंगनानेच केले आहे. या सिनेमात फिरोज गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता अधीर भट्ट दिसतोय. जो एक उत्तम लेखकसुद्धा आहे. असे असले तरीही फार कमी लोक अधीरला जवळून ओळखतात. या अभिनेत्याचे काश्मीरसोबत एक खास कनेक्शन आहे. ते नेमकं काय आहे? याविषयी आपण जाणून घेऊया. (Adhir Bhat has a special connection with Kashmir)
अधीर भट्टचे काश्मीर कनेक्शन
अभिनेता अधीर भट्टने इमरजेंसी सिनेमात फिरोज गांधी यांचे पात्र साकारले आहे. या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली. त्याच्या अभिनयाचे समीक्षकांनी कौतुक केले. अशा या अभिनेत्याला जवळून ओळखणारे आणि त्याच्याविषयी माहिती असणारे फार कमी लोक आहेत. ज्यांना हे माहितेय की, अधीर हा काश्मीरचा मूळ रहिवासी आहे. तो गेल्या 15 वर्षांपासून सिनेविश्वात कार्यरत असला तरी त्याची नाळ काश्मिरसोबत जोडलेली आहे. अभिनेता अधीर भट्टने ‘इमरजेंसी’मध्ये काम करण्यापूर्वीदेखील काही सिनेमा तसेच सिरीजमध्ये काम केले आहे.
मोठमोठ्या फिल्ममेकर्ससोबत केलंय काम
अभिनेता अधीर भट्टने आतापर्यंत बॉलिवूड सिनेविश्वातील अनेक दिग्गज सिने निर्माते तसेच दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. एकता कपूर, अनुराग बसु आणि विधु विनोद चोप्रासारख्या दिग्गजांसोबत त्याने कामाचा अनुभव घेतला आहे. माहितीनुसार, अभिनेता अधीर भट्टने ‘तनाव’, ‘बंदिश बँडिट्स’ आणि ‘कारवा’सारख्या यशस्वी सिनेमांमध्ये काम केले आहे. या यादीत आता ‘इमरजेंसी’चाही समावेश झाला आहे.
अभिनेता अधीर भट्टविषयी आणखी सांगायचे म्हणजे, तो एक उत्तम लेखक आहे. शिवाय त्याला 5 विविध भाषांचे विशेष ज्ञान आहे. त्याने आतापर्यंत अनेक चांगल्या कलाकृतींसाठी काम केले आहे. तरीही अधीरला त्याची हक्काची अशी ओळख मिळालेली नाही. दरम्यान, इमरजेंसी सिनेमामूळे त्याच्या सिनेविश्वातील कारकिर्दीला टर्निंग पॉईंट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कंगनाच्या ‘इमरजेंसी’ या सिनेमाचे एकूण बजेट 60 करोड इतके असून आतापर्यंत त्याचा गल्ला केवळ 17.44 करोड रुपये इतकाच झाला आहे. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू चालवू शकला नाही हे स्पष्ट होत आहे. दरम्यान, कंगनाच्या कारकिर्दीतला हा 11 वा फ्लॉप सिनेमा असला तरी अधीरच्या कारकिर्दीला तो बळकटी देणारा ठरू शकतो असे म्हटले जात आहे. भले ‘इमरजेंसी’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसेल. पण या सिनेमातून अधीरने साकारलेल्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यामुळे हा सिनेमा येत्या काळात अधीरच्या करिअरला नव्या संधींचा मार्ग मोकळा करून देणारा ठरू शकतो.
हेही पहा –
Salman Khan : प्रेम पुन्हा येतोय? प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिले सलमानच्या नव्या सिनेमाचे अपडेट