प्रिती झिंटानंतर सलमानला लागले पिता होण्याचे वेध, सरोगेसी करतोय प्लान

बॉलीवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटा दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. गुरुवारी प्रितीने इन्स्टाग्रामवर आपण आई झाल्याची गोड बातमी शेअर केली. त्यानंतर प्रितीच्या चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. याचदरम्यान, प्रितीनंतर बॉलीवूडचा दबंग सलमान खान हा देखील पिता होण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण सलमानला सरोगेसीच्या माध्यमातून पप्पा व्हायचं असून त्यासाठी तो डॉक्टरांबरोबर चर्चा करत असल्याचं बोललं जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये सरोगेसी पॅरेंटसचा ट्रेंड आहे. बॉलीवूडचा किंग शाहरुख खान- गौरी खान हे सरोगेसीच्या माध्यमातून तिसऱ्यांदा आई बाबा झाले. त्यानंतर आमिर खान- किरण राव, शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा, लीजा रे-जेसन या जोडप्यांसह करण जौहर, एकता कपूर आणि तुषार कपूर यासारख्या अविवाहीत सेलिब्रिटीज सरोगेसीचा वापर करत पालक झाले आहेत. याचदरम्यान, २०१८ साली सरोगेसी विधेयकही आले. यात काही तरतुदी करण्यात आल्या. यात प्रामुख्याने एकल पालकत्वासाठी इच्छुक असलेल्यांसाठी अनेक नियम बनवण्यात आले आहेत. यामुळे अविवाहीत किंवा एकट्या असणाऱ्या व्यक्तींना सरोगेसीतून पालकत्व मिळवताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

दरम्यान, जर एखाद्या कलाकाराला सरोगेसीतून मूल हवे असेल तर डॉक्टर त्याच वय आणि फिटनेस बघून तसा सल्ला देतात. त्यातच आता सलमाननेही पन्नाशी ओलांडली असून लग्न न करण्याचाच निर्णय घेतला आहे. यामुळे जेव्हा जेव्हा त्याला लग्नासंदर्भात विचारण्यात येतं तेव्हा तो विषय़ टाळतो. पण सलमानला लहान मुल आवडतात. बहीण अर्पिता आणि भाऊ सौहेलच्या मुलाबरोबरचे फोटो तो नेहमी सोशल मिडियावर शेअर करत असतो.

पण आता सलमाननेही सरोगेसीतून पालक होण्याचा निर्णय घेतल्याचे त्याच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे. त्यात आता प्रिती सरोगेसीतून दोन मुलांची पालक झाल्याने सलमाननेही सरोगेसीचा विचार सुरू केल्याची चर्चा आहे. याबाबतीत तो कुटुंबीयाबरोबर चर्चाही करतोय.